
हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर आमदार सुरेश भोळेंची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. जिल्हाध्यक्ष बदलानंतर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त होती,
जळगाव : अध्यक्ष बदलल्यापासून प्रतीक्षेत असलेली भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी गुरुवारी (ता.११) जाहीर केली. १३ उपाध्यक्षांसह तीन सरचिटणीस व ११ चिटणीसांचा त्यात समावेश असून, नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या समर्थकांनाही आवर्जून स्थान दिले आहे.
हरिभाऊ जावळे यांच्या निधनानंतर आमदार सुरेश भोळेंची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. जिल्हाध्यक्ष बदलानंतर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त होती, तेव्हापासून नवीन कार्यकारिणीची प्रतीक्षा होती. अखेर गुरुवारी ही बहुप्रतीक्षित कार्यकारिणी जाहीर झाली.
बारा उपाध्यक्षांचा समावेश
कार्यकारिणीत अध्यक्ष भोळे यांच्यासह पी. सी. पाटील (धरणगाव), पद्माकर महाजन (रावेर), राकेश पाटील (वडगाव, ता. चोपडा), डी. एस. चव्हाण (मुक्ताईनगर), अजय भोळे (भुसावळ), के. बी. साळुंखे (चाळीसगाव), कांचन फालक (डांभुर्णी, यावल), महेश पाटील (अमळनेर), नंदकिशोर महाजन (तांदलवाडी, यावल), रेखा चौधरी(पारोळा), शरद महाजन (फैजपूर), हिरालाल चौधरी (फैजपूर), डॉ. विजय धांडे (रोझोदा, रावेर) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
सचिन पानपाटील (कासोदा, एरंडोल), मधुकर काटे (पाचोरा), हर्षल पाटील (यावल) सरचिटणीस असतील. चिटणीस म्हणून नवलसिंग राजपूत (जामनेर), कविता महाजन (जळगाव ग्रामीण), सविता भालेराव (वड्री, यावल), ॲड. प्रशांत पालवे (चाळीसगाव), राजेंद्र चौधरी (टाकडी, भुसावळ), संतोष खोरखोडे (मुक्ताईनगर), रंजना नेवे (चोपडा), रवींद्र पाटील (पारोळा), मेघा जोशी (भुसावळ), सोमनाथ पाटील (भडगाव), शैलजा चौधरी (भुसावळ) यांचा समावेश असून, अनिल खंडेलवाल (बोदवड) कोशाध्यक्ष, तर गणेश माळी (रावेर) कार्यालयमंत्री असतील.
कार्यकारिणीत घोळात घोळ
कार्यकारिणी जाहीर करताना भाजपकडून सुरवातीला एक यादी आली. त्यात उपाध्यक्षांच्या नावांमध्ये फैजपूरच्या भरत महाजन यांचा उल्लेख होता. सुधारित यादी काही वेळानंतर पाठवली, त्यात भरत महाजनांचे नाव वगळून हिरालाल चौधरींचे नाव समाविष्ट होते. नंतर पुन्हा नवी सुधारित यादी पाठविण्यात आली, त्यात भरत महाजन नावाऐवजी शरद महाजन (फैजपूर) असा बदल करण्यात आला. त्यामुळे सुरवातीला व्हायरल झालेल्या यादीमुळे भाजपच्या वर्तुळात चांगलाच गोंधळ झाला.
संपादन ः राजेश सोनवणे