esakal | रात्र काळ बनून आली..दहा सदस्‍यांचे अख्खे कुटूंब अपघातात उध्वस्‍त; निरागस खुशी गर्दी पाहुन हादरली

बोलून बातमी शोधा

accident family death}

रावेरहून धुळे जाणारा हा मोलमजुरी करणाऱ्या परिवारासाठी रात्र काळच बनून आली. अगदी लहानग्‍यांना घेवून संपुर्ण कुटूंब कामासाठी नाशिक किंवा धुळे येथे जातो. काम आटोपून परत येत असताना रात्री ढाब्‍यावर जेवण घेतले अन्‌ डोळाच लागला तो कायमचाच.

रात्र काळ बनून आली..दहा सदस्‍यांचे अख्खे कुटूंब अपघातात उध्वस्‍त; निरागस खुशी गर्दी पाहुन हादरली
sakal_logo
By
दिलीप वैद्य /प्रदीप वैद्य

रावेर (जळगाव) : दीडशे ते दोनशे रूपयांचा रोज मिळविण्यासाठी रावेरहून धुळे जाणारा हा मोलमजुरी करणाऱ्या परिवारासाठी रात्र काळच बनून आली. अगदी लहानग्‍यांना घेवून संपुर्ण कुटूंब कामासाठी नाशिक किंवा धुळे येथे जातो. काम आटोपून परत येत असताना रात्री ढाब्‍यावर जेवण घेतले अन्‌ डोळाच लागला तो कायमचाच. झोपेतच काळाने झडप घातली आणि पंधरा जणांचा जागीच मृत्‍यू झाला. या पंधरा जणांमध्ये एकाच कुटूंबातील दहा सदस्‍यांचा समावेश आहे.

दीपिका आणि खुशीवर आभाळच कोसळले
मनाला सर्वाधिक चटका लावणारी घटना म्हणजे दीपिका आणि खुशी या दोन बालिकांवर ओढवलेले संकट. या अपघातात दोघांची आई कमलाबाई, बहीण शारदा आणि भाऊ गणेश या तिघांचा मृत्यू झाला आहे. या दोघींचे वडील रमेश मोरे हे दोन वर्षांपूर्वी घरातून निघून गेले आहेत. त्यामुळे आई कमलाबाई त्यांचे पालन पोषण करत होती. या घटनेने दोघी अक्षरशः भेदरल्या आहेत. आपल्या घराभोवती झालेली एवढी मोठी गर्दी बघून नेमके काय झाले हे लहानग्या खुशीला नीट कळतच नाही. मात्र तिच्याहून दीड वर्ष मोठी असलेल्या दीपिकाला त्याची जाणीव झाली आणि तिने हंबरडा फोडला. हे बघून लहानगी खुशीही तिला बिलगून रडू लागली आणि तिथे जमा झालेल्या नातेवाइकांचे आणि गावकऱ्यांचे डोळेही पाणावले.

कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू
सदरच्‍या घटनेत अशोक वाघ या कुटुंब प्रमुखाबरोबरच त्यांचा मुलगा सागर, पत्नी संगीता, अविवाहित पुतण्या नरेंद्र, अशोक यांची बहीण कमलाबाई मोरे, दुसरी बहीण सुमन इंगळे, भाची शारदा मोरे, विवाहित भाची दुर्गाबाई भालेराव, भाचा गणेश मोरे आणि भाचे जावई संदीप भालेराव यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अभोडा गावातीलच सबनुर हुसेन तडवी आणि त्यांचा मुलगा दिलदार हुसेन तडवी या दोघांचाही मृत्यू झाला. तडवी कुटुंबाचे गावात स्वतःचे घरही नाही. हात मजुरी करून हे कुटुंब चरितार्थ चालवत होते.

विवाहानंतर लगेच मृत्यू
अभोडा येथील रहिवासी दुर्गाबाई हिचा काही महिन्यांपूर्वीच विवरा येथील संदीप युवराज भालेराव यांच्याशी विवाह झाला होता. दुर्गाबाई ही किनगांव येथील दुर्घटनेत मरण पावलेल्या सुमनबाई इंगळे हिची मुलगी आहे. या दुर्घटनेत आई, मुलगी आणि जावई यांचे एकाच वेळी निधन झाले आहे.

सव्वादोनशे मजूर जातात धुळे अन्‌ नाशिक जिल्ह्यात 
सध्या केळीची कापणी बऱ्यापैकी कमी झाली आहे. त्यामुळे मजुरांना रोजगार मिळेनासा झाला आहे. म्हणून नाईलाजाने या अभोडा गावातील सुमारे सव्वा दोनशे ते अडीचशे मजूर धुळे आणि नाशिक जिल्ह्यात पपई तोडणीसाठी दीडशे ते दोनशे रुपये रोज मजुरीने जातात. यात मजुरांचा ठेकेदार या मजुरांकडून पैसे घेतो. या सर्वच मृतांच्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून घरात खर्चालाही पैसे नाही; अशी सर्व कुटुंबाची परिस्थिती आहे. या मृतांपैकी कोणाकडेही शेती नाही. सर्वच कुटुंब हात मजुरी करून आपले पोट कसेबसे भरतात अशी स्थिती आहे.

संपादन ः राजेश सोनवणे