शिवभोजनाच्या रोज ३४३५ थाळ्यांचे वितरण; आतापर्यंत दहा लाखांवर मिळाला लाभ 

shiv bhojan
shiv bhojan

जळगाव : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची सत्ता आल्यानंतर २६ जानेवारी २०२० ला गरिबांसाठी दहा रुपयांत भोजन देण्याची योजना सुरू झाली. राज्यभरात विविध ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू झाली. जळगाव जिल्ह्यात आजअखेर ३८ शिवभोजन केंद्रे आहेत. त्याद्वारे आतापर्यंत दहा लाख ७४ हजार २५० जणांना थाळ्यांचे वाटप करण्यात आले. तेवढ्या लोकांची भूक अल्पदरात शिवभोजन केंद्रांनी भागविली आहे. शासनाच्या शिवभोजन केंद्रांना जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
जळगाव जिल्ह्यात २६ जानेवारी २०२० ला नऊ ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू झाली. नंतर टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करून ग्रामीण भागातही केंद्रे सुरू झाली. आता शहरी भागात १६, तर ग्रामीण भागात २२ अशा एकूण ३८ केंद्रांतून तीन हजार ४३५ थाळ्यांचे वितरण होत आहे. लाभार्थ्यांना पूर्वी दहा रुपयांत भोजन मिळत असे. कोरोनामुळे दहा रुपयांचे भोजन पाच रुपयांवर आणले आहे. कोरोनाकाळात संसर्ग होऊ नये म्हणून थाळी पॅकिंग करून दिली जात होती. आता लाभार्थ्यांना केंद्रात बसूनच भोजन घेता येते. 
विशेषतः मोलमजुरी करणारे, गरीब, निराधारांना या योजनेचा लाभ होत असल्याने शासनाच्या या योजनेविषयी समाधान व्यक्त होत आहे 
 
लॉकडाउन काळात भागवली क्षुधा 
लॉकडाउनच्या काळात घराबाहेर निघता येत नव्हते. गरीब, गरजूंच्या भोजनाचे मोठे हाल होत होते. यामुळे काही शिवभोजन केंद्र चालकांनी अत्यावश्‍यक सेवा म्हणून गोरगरिबांना त्यांच्या ठिकाणी जाऊन शिवभोजन पॅकिंग पद्धतीने मोफत दिले होते. अनेकांचे भोजनासाठी होणार हाल यामुळे थांबले होते. 

शिवभोजन केंद्रातील थाळ्यांची संख्या वाढविण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून मागणी आहे. शासनाकडे त्यासाठी शहरासाठी एक हजार थाळ्या व तालुकास्तरावर पाचशे अशा एकूण दीड हजार थाळ्या वाढवून मिळण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. 
- सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com