esakal | निर्बंध काळात ९५ हजार लाभार्थ्यांना शिवभोजन
sakal

बोलून बातमी शोधा

shiv bhojan thali

निर्बंध काळात ९५ हजार लाभार्थ्यांना शिवभोजन

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ (Break the chain) अंतर्गत १५ एप्रिलपासुन विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहे. या काळात कोणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये. याकरीता शससनाने राज्यात शिवभोजन (Shiv bhojan) थाळी मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील गरजूंना चांगलाच फायदा झाला असून निर्बंध काळात जिल्ह्यात ९४ हजार ८५७ लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा मोफत लाभ घेतल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली. (Shiv Bhojan for 95,000 beneficiaries during the restricted period)

जिल्ह्यासाठी ७०० थाळ्यांचे उद्दिष्ट शासनाकडून देणेत आले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये हा इष्टांक दुप्पट म्हणजेच १४०० थाळी इतका करण्यात आला. शासनाच्या २६ मार्च, २०२० च्या परिपत्रकानुसार तालुका स्तरावर शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात येऊन जिल्ह्याचा इष्टांक ३ हजार ५०० थाळींपर्यंत वाढविण्यात आला. शासनाने टप्प्याटप्प्याने उद्दिष्टाबरोबरच क्षेत्राचा देखील विस्तार करून ही योजना तालुकास्तरावर कार्यान्वित केली.

हेही वाचा: हावडा एक्स्प्रेसमध्ये पुन्हा प्रवाशाचा मृत्यू; अमळनेर स्थानकावर मृतदेह उतरवत कोच सॅनिटायझेशन

३८ केंद्रावर होतेय वाटप

सद्यस्थितीत एकूण ३८ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. शहरी भागात १६ व ग्रामीण भागात २२ केंद्र आहेत. शहरी भागात १६ केंद्रामधून १ हजार २५० थाळ्या तसेच ग्रामीण भागात २२ केंद्रामधून २ हजार १७५ थाळ्या वितरीत करण्यात येतात. शिवभोजन ॲपवर प्रत्येक लाभार्थ्याचा फोटो व लाभार्थ्याचे पुर्ण नांव याची नोंद घेण्यात येते. लाभार्थ्यांना वरण, भात, एक भाजी आणि दोन चपाती एका थाळीमध्ये देण्यात येत आहे.

पाच हजाराहून अधिक थाळ्या

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १५ एप्रिल पासून विशेष निर्बंध लागू असल्याने शासनाने एक महिना कालावधीसाठी शिवभोजन केंद्रांचा इष्टांक दिडपटीने वाढवून दिला असून त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३८ शिवभोजन केंद्रांना इष्टांक दिडपटीने वाढवून दिल्याने याचा लाभ जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना दररोज होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज ५ हजार १२५ थाळ्यांचे वितरण सुरू आहे.

हेही वाचा: success story : शेतकरीपुत्र झाला इंजिनिअर पण धडपड बळीराजासाठीच; ‘हवामान’ ॲप ठरणार वरदान

आतापर्यंत बारा लाख

विशेष निर्बंध कालावधीमुळे एक महिना ही थाळी पुर्णपणे मोफत देण्यात येत आहे. निर्बंध कालावधीत जिल्ह्यात या मोफत शिवभोजन थाळीचा लाभ ९४ हजार ८५७ लाभार्थ्यांनी घेतला आहे. तर राज्यात शिवभोजन थाळी योजना कार्यान्वित झाल्यापासून आजपावेतो जिल्ह्यात १२ लाख ९५ हजार ४५० लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.