
मुलीस ‘टिकटॉक’ सह सोशल मीडियावर स्वतःचे व्हिडिओ- फोटो टाकण्याचा नाद असून त्यातूनच मुलाने तिच्यावर पाळत ठेवत थेट मित्रांसह कार घेऊन येत तिचे घर गाठले
जळगाव : टिकटॉक आणि सोशल मीडियावर फोटो- व्हिडिओ टाकण्याच्या नादातून मुलीचा संपर्क होऊन संशयिताने तिचा पिच्छा पुरवत घर गाठले. मित्रांसोबत कारमधून मुलीला पळवून नेत चिंचखेडा (जामनेर) येथे तीन दिवस तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आले असून संशयितास न्यायालयाने पोलिस कोठडीत रवाना केले आहे.
शहरातील जुना नशिराबाद रोड परिसरात १५ वर्षीय पिंकी (काल्पनिक नाव) ही अल्पवयीन मुलगी विधवा आई, आजी, मोठी बहीण व भावासोबत वास्तव्यास आहे. रविवारी (ता. २७) रात्री ९ वाजेच्या सुमारास मुलगी आई- आजी व बहिणीसह घराबाहेर बसली होती. यावेळी त्यांच्या घराजवळच येऊन एक कार थांबली. ओट्यावर बसलेली आई, आजी घरात जाताच पिंकीला या कारमधून एकाने जवळ बोलावले आणि नंतर आत बसवून पळवून नेले. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून शनिपेठ पेालिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
जामनेरातून सुटका
निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या पथकातील महिला उपनिरीक्षक यशोदा कणसे, साहाय्यक फौजदार सलिम पिंजारी आणि गुन्हेशोध पथकातील कर्मचारी पिडीतेचा शोध घेत होते. चिंचखेडा जामनेर येथून मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने रात्रीतून जामनेर गाठत पिडितेस ताब्यात घेत संशयित तरुण राहुल भिका जोहरे याला अटक करण्यात आली. राहुलला जिल्हा न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यास तीन दिवस पेालिस कोठडीत सुनावली असून गुन्ह्यात वापरलेली कार आणि उर्वरित संशयितांचा पेालिस शोध घेत आहे.
मुलाच्या बापानेच दिली ‘टीप’
प्राप्त माहिती नुसार, जुने नशिराबाद रोडवरून पंधरावर्षीय मुलीला मुलगा राहुल याने पळवून आणल्याची माहिती मिळताच मुलाचे वडील भिका दामोदर जोहरे यांनी शनिपेठ पोलिसांना माहिती कळवल्यावर पोलिसांनी धाव घेतली.
टिकटॉकचा नाद खुळा
मुलीस ‘टिकटॉक’ सह सोशल मीडियावर स्वतःचे व्हिडिओ- फोटो टाकण्याचा नाद असून त्यातूनच मुलाने तिच्यावर पाळत ठेवत थेट मित्रांसह कार घेऊन येत तिचे घर गाठले आणि पळवून नेल्याची माहिती समोर आली आहे.
संपादन ः राजेश सोनवणे