पाटबंधारे महामंडळाचा कारभार उसनवारीवर; जलसंपदामंत्र्यांकडून पदे भरण्याची अपेक्षा 

tapi patbandhare mahamandal
tapi patbandhare mahamandal

भडगाव (जळगाव) : राज्यातील जलसंपदा विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. पदोन्नत्या रखडल्यामुळे पदे रिक्त आहेत. तापी पाटबंधारे महामंडळातील महत्त्वाचे सर्व पदे रिक्त असल्याने विभागाचा कारभार प्रभारीवरच सुरू आहे. तब्बल ५० टक्क्यापर्यंत पदे उसनवारीवर सुरू आहेत. त्यामुळे राज्याचे जलसंपदामंत्री याबाबत काय निर्णय घेतील, याकडे लक्ष लागून आहे. 
राज्यात जलसंपदा विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. परिणामी, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण जाणवत आहे. दिवाळीपूर्वी जलसंपदा विभागातील अभियंत्यांना बढती देण्याचे जलसंपदामंत्र्यांनी आश्वासन दिले होते. मात्र, काही पदे सोडले, तर उर्वरित पदावरील अभियंत्यांना अद्याप पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. 

रिक्त पदांचे ग्रहण 
रिक्त पदांमुळे अधिकाऱ्यांना कामाचा प्रचंड ताण सहन करावा लागत आहे. त्यात कोरोनामुळे राज्यात भरतीप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता तरी भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. 

पदोन्नत्या रखडल्या 
विविध अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्याही रखडलेल्या आहेत. राज्यातील वेगवगळ्या संवर्गातील २८० अधिकाऱ्यांना बढतीची प्रतीक्षा आहे. गेल्यावर्षी महाविकास आघाडी सरकारने बांधकाम विभागातील तब्ब्ल २५० अभियंत्यांचे पदोन्नतीचे आदेश दिले होते. मग जलसंपदा विभागातील अभियंत्याची पदोन्नती केव्हा होईल, असा प्रश्न विचारला जात आहे. 

‘गिरणा’ला भार सोसवेना 
गिरणा पाटबंधारे विभागात ५१९ पदे मंजूर आहेत. मात्र, त्यातील तब्बल ३२१ पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे अवघ्या १९८ जणांच्या खांद्यावर ६९ हजार ३५० हेक्टर क्षेत्र व त्यावरील एक हजार ६६४ किलोमीटर लांबीचे कालवे, वितरिकांची जबाबदारी येऊन ठेपली आहे. जे कर्मचारी निवृत्त झाले, त्यांच्या जागेवर गेल्या १० वर्षांपासून नवीन कर्मचाऱ्यांची भरतीच झालेली नाही. 

तापी महामंडळात ‘प्रभारी’राज 
तापी पाटबंधारे विकास महामंडळ प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकाचा पदभार अमरावती विभागाचे मुख्य अभियंता बसंवत स्वामी यांच्याकडे आहे. तापी महामंडळांतर्गत तीन अधीक्षक अभियंता येतात. त्यांचाही भार प्रभारींकडे सोपविला आहे. एकूणच तापी पाटबंधारे विभाग हात उसनवारीवर सुरू आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com