‘महाआयटी’ फेल.. शिक्षकांचे थकीत वेतन मिळणार ऑफलाइन 

teacher
teacher

अमळनेर (जळगाव) : राज्यातील खासगी अंशत: व पूर्णत: अनुदानित शाळेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन ‘महाआयटी’कडून विकसित करण्यात आलेल्या शालार्थ प्रणालीतून ऑनलाइन पद्धतीने अदा करण्यात येते. मात्र, या ऑनलाइनच्या युगात शासकीय यंत्रणेला ‘जुने ते सोने’ म्हणत पुन्हा या कर्मचाऱ्यांची थकीत देयके, वैद्यकीय देयके (अग्रीम व प्रतिपूर्ती), लोकायुक्त व न्यायालयीन प्रकरणातील थकीत देयके ऑफलाइन काढण्याची वेळ आली आहे. 
यात सुधारित वेतन संरचना लागू केल्यानंतर देय असणारा वेतनातील फरक (थकबाकी)चा ही समावेश आहे. थकीत वेतन ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत महाआयटीस वेळोवेळी कळविले आहे. मात्र, ते यात सपशेल फेल ठरले आहेत. सद्य:स्थितीत शालार्थ प्रणालीमध्ये ही थकीत वेतन ऑनलाइन पद्धतीने अदा करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने सदर देयकांना ऑफलाइन पद्धतीने अदा करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या पार्श्वभूमीवर हे थकीत वेतन ऑफलाइन पद्धतीने अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. 

१७ फेब्रुवारीला आदेश
राज्यातील मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधी किंवा राष्ट्रीय निवृत्तिवेतन अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू नसल्याने सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनाची थकबाकी एकरकमी रोखीने अदा करण्याबाबत १७ फेब्रुवारीला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ही थकबाकी अदा करण्यात येणार आहे. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित निवृत्तिवेतन योजना लागू आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी डीसीपीएस स्तर-२ खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. १० जानेवारी २०२० च्या शासन निर्णय अर्धवेळ आणि अंशत अनुदानित शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना, परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना अथवा भविष्यनिर्वाह निधी योजना लागू नाही, अशा कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी शासन निर्णयातील खंड ‘ब’मध्ये नमूद केलेल्या रकमा वजा/समायोजित करून पाच समान हप्त्यांत पाच वर्षांत रोखीने अदा करण्याबाबत मान्यता दिली आहे. यातील पहिला हप्ता अदा करण्यात येणार आहे. 

..अशी मिळाली मान्यता 
राज्यातील मान्यताप्राप्त पूर्णत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना नवीन परिभाषित निवृत्तीवेतन योजना लागू आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला हप्ता डीसीपीएस स्तर- २ खात्यामध्ये जमा करणे. तसेच अद्यापि शालार्थ प्रणालीतून थकीत देयके, वैद्यकीय देयके (अग्रीम व प्रतिपूर्ती), न्यायालयीन व लोकायुक्त प्रकरणातील थकीत देयके ऑनलाइन पद्धतीने अदा करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने अशा देयकांना मार्च २०२१ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अदा करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे पत्रक शासनाचे सहसचिव इ. मु. काझी यांनी बुधवारी (ता.१०) काढले आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com