आता टेनिस बॉल क्रिकेटपटूंना मिळणार सरकारी नोकरी 

चेतन चौधरी
Monday, 8 February 2021

क्रीडा विभागाच्या प्रस्तावावर टेनिस बॉल क्रिकेटमधील गुणी खेळाडूंना शासकीय विभागात गट ‘क’च्या पदांवर भरती करण्याचे मान्य केले आहे. तसेच या खेळाचा समावेश यादीमध्ये करण्यात आला आहे.

भुसावळ (जळगाव) : टेनिस बॉल क्रिकेटपटूंना सुद्धा सरकारी शासकीय सेवेत आता नोकरी मिळू शकेल, त्यांची नियुक्ती रोजगार मंत्रालय किंवा केंद्र सरकारच्या केंद्रीय विभागातील गट ‘क’ पदावर केली जाईल. भरतीसाठी तयार केलेल्या क्रीडा कोटातील यादीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट ६४ व्या क्रमांकावर जोडले गेले आहे. हे आदेश केंद्र सरकारच्या कर्मचारी तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने जारी केले आहे, अशी माहिती राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव डॉ. एम. बाबर यांनी दिली. 
भारत सरकारचे अतिरिक्त सचिव प्रदीप कुमार यांच्या वतीने गत आठवड्यात कार्यालयाचा आदेश जारी करण्यात आला आहे. क्रीडा विभागाच्या प्रस्तावावर टेनिस बॉल क्रिकेटमधील गुणी खेळाडूंना शासकीय विभागात गट ‘क’च्या पदांवर भरती करण्याचे मान्य केले आहे. तसेच या खेळाचा समावेश यादीमध्ये करण्यात आला आहे. भरतीची संबंधित इतर क्रीडाबाबत खेळाडूंच्या नियुक्तीसाठी जे पात्रता आणि निकष लागू असतील त्याच समान अटी लागू असतील. क्रीडा विभागाने एक सप्टेंबर २०२० ला हा प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांकडे पाठवला होता. 

खेळाडूंचा कल 
टेनिस बॉल क्रिकेट हा कमी खर्चिक खेळ असून, यामध्ये कुठल्याही प्रकारच्या महागड्या किटची आवश्यकता नसते. तसेच टेनिस बॉल क्रिकेट खेळल्यानंतर शासकीय सेवेत नोकरीची संधी मिळणार असल्यामुळे सरकारच्या या निर्णयाने टेनिस बोल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये आनंद संचारला आहे.

टेनिस बॉल क्रिकेट लीगही होणार
पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात आता टेनिस बॉल क्रिकेटकडे खेळाडूंची क्रेझ वाढेल, याच बरोबर आयपीएलच्या धर्तीवर लवकरच टेनिस बॉल क्रिकेटची ही लीग होणार असल्याची माहिती टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अभिनव तिवारी, सचिव इम्रान लारी, राज्य संघटनेचे सचिव इंडियन फेडरेशनचे चेअरमन डॉ. एम. बाबर, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष तसेच जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल दिली. 
 
संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news tennis ball cricketer in goverment job reservation