हरवलेली तीन वर्षीय अबोल चिमुरडी पोलिसांना म्‍हणते..घराजवळ गायी, म्‍हशी

रईस शेख
Monday, 11 January 2021

पिण्यास पाणी, बिस्कट, चॉकलेट देत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पायी चालून आणि रडून थकलेली चिमुरडीला पप्पा..मम्मा, आई असेच बोलता येई..तीने घराजवळ हम्बा..गाय, गोठा असे वर्णन

जळगाव : साधारण तीस वर्षापुर्वी मुकबधीर अबोल चिमुरडी घरातून बेपत्ता झाली अन्‌ थेट पाकीस्‍तानातच पोचली हेाती. नुकतीच ती, भारतात आपले कुटूंब शोधत आहे. घरा जवळील मंदिर, नदी अशा जागा ती सांगते..हा सीन होता ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील. तशाच पद्धतीने घराजवळ गायी, म्हशींचा गोठा सांगणाऱ्या चिमुरडीच्या पालकांना पोलिसांनी शोधुन काढले असून हरवलेली चिमुरडी खाकीच्या कड्यावरून आईच्या कुशीत विसावली. 

सम्राट कॉलनीतील गवळीवाडा येथील रहिवासी योगेश मारुती गवळी कुटूंबीयांसह वास्तव्यास आहे. त्यांची मुलगी भाग्यश्री (वय ३) हि अंगणात खेळता-खेळता सम्राट कॉलनीतून थेट राष्ट्रीय महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ पोचली. रडून- रडून थकलेल्या या चिमुरडीला पाहिल्यावर परिसरातील नागरीकांनी एमआयडीसी पोलिसांना कळवले. मुलीला पेालिस ठाण्यात आणल्यावर साध्यावेशातील महिला पेालिस निलोफर सय्यद यांनी तिला जवळ घेत, पिण्यास पाणी, बिस्कट, चॉकलेट देत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पायी चालून आणि रडून थकलेली चिमुरडीला पप्पा..मम्मा, आई असेच बोलता येई..तीने घराजवळ हम्बा..गाय, गोठा असे वर्णन केल्यावर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, राकेश बच्छाव, अतूल पाटील अशा कर्मचाऱ्यांनी शोध मोहिम सुरू केली. जोशी कॉलनी, मेहरुण, तांबापूरा, रामनगर, शिरसोलीरोडवरील गोठे शोधत असतांना सम्राट कॉलनीत पोलिस धडकले. नुकतेच तिचे कुटूंबीय गल्लीत तिला शोधत असतांना आढळल्यावर मुलीचा फोटा दाखवल्यावर त्यांनी मुलीस ओळखले. 

अन्‌ मातृत्व झळकले 
मुलीच्या कुटूंबीयांचा शोध लागल्यावर पिता योगेश मुलीला घेण्यासाठी पेालिस ठाण्यात आला. मुलीला पाहताच त्याने घट्ट मिठी मारली..पोलिसांचे पाणावलेल्या डोळ्यांनी आभार मानले..अन्‌ भाग्यश्रीला बघताच घारीप्रमाणे आईने पंख पसरवतच कवेत घेतले. आईचे प्रेम बघणाऱ्यांचे डोळ्यातूनही अश्रु तरळले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news three year girl missing police searching home