जळगाव जिल्ह्यात ‘अवकाळी’चा तडाखा 

unseasonal rains
unseasonal rains

जळगाव : शहरासह जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, अमळनेर, पारोळा, जामनेर, बोदवड तालुक्यांसह विविध भागाला शनिवारी (ता. २०) सायंकाळी अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. 
विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे आणि गारपिटीने रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसह मका, केळी आणि फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जे पिकले होते, त्याची पुन्हा एकदा माती झाली. ऐन उन्हाळ्यात अचानक कोसळलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने पुन्हा हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

चाळीसगावात गारांचा पाऊस 
चाळीसगाव : शहरासह परिसरात शनिवारी दुपारी गारांचा पाऊस झाला. सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे विशेषत: बाजारात दुकानदारांची एकच धांदल उडाली. दुपारी दोनपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. चार वाजून ४० मिनिटांनी पावसाला सुरवात झाली. सुरवातीला रिमझिम सुरू झालेल्या पावसाने काही मिनिटांतच वेग घेतला. जवळपास अर्धा तास बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. या पावसाचा मका, कांदा, ज्वारी, बाजरी, हरभरा, गहूसह केळी पिकाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, शहरासह परिसरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. तर हिरापूर रोड, नागद रोड भागात झाडे उन्मळून पडली होती. 
 
पाचोरा तालुक्‍यात गारपीट 
निंभोरी : पाचोरा तालुक्यात दुपारी चार ते पाचच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन निंभोरी, वाडी शेवाळे, सातगाव (डोंगरी), वरखेडी, लोहारी, साजगाव, बिल्धी, कुऱ्हाड या शेतशिवारात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. याच वेळी सतत २० मिनिटे मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यात परिसरातील मका, गहू, हरभरा, दादर, तूर, व उर्वरित कापसाचे मोठे नुकसान झाले असून, जनावरांचा चारा शंभर टक्के नष्ट झाला आहे. 
 
बहादरपूर मंडळात गारपीट 
पारोळा : शहरात सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह रिमरिम पावसाला सुरवात झाली. बहादरपूर मंडळातील बहादरपूर, शिरसोदे व महाळपूर परिसरात गारपीट झाल्याने अनेकांची भंबेरी उडाली. दरम्यान, शुक्रवारी रात्रीपासूनच गारवा जाणवू लागला होता. शनिवारी (ता. २०) शहरात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस आला. अचानक वादळी वाऱ्यामुळे अनेक व्यापाऱ्यांची धांदल उडाली. दरम्यान, तालुक्यात अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याचे दिसून येत असून, रब्बी हंगामाला मोठा बसण्याची शक्यता आहे. 

तळेगाव, तोंडापूर परिसरातही पाऊस 
तळेगाव/तोंडापूर : जामनेर तालुक्यात तळेगाव व तोंडापूर परिसरात दुपारी चारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. गहू, हरभरा, ज्वारी, मका, काढणीवर आले असताना पावसाच्या बेमोसमी हजेरीमुळे शेतकरी धास्तावले आहेत. तोंडापूर येथे सुमारे १५ मिनिटे गारांचा पाऊस झाला. या पावसाने शेतातील मजूर व शेतकऱ्यांची धावपळ उडाली. पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. 
या व्यतिरिक्त बोदवड तालुक्यात जामठी, मुक्तळ, पळासखेडा, सुरवाडा, मानमोडी व परिसरात झालेल्या पावसामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. केळी, गहू,  हरभरा, मका, बाजरी जमीनदोस्त झाल्याने  शेतकरी हवालदिल झाला. तर अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. तर अमळनेर तालुक्यात वावडेसह काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. कासोदा (ता. एरंडोल) येथेही सायंकाळी साडेपाचला जवळपास दहा मिनिटापर्यंत गारा पडल्याने गल्लीबोळात गारांचा थर जमा झाला होता. आडगावला देखील पावसाने हजेरी लावली. गोंडगाव (ता. भडगाव) परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यांसाह पाऊस झाला. 
 
सावद्यात वादळी वारा 
सावदा : शहर व परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास वादळाचा तडाखा बसल्याने सावदा अनेक लहान मोठी वृक्ष जमिनीवर आडवी झाली. तर वीज तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. शेती शिवारातील पिकांचे किती नुकसान झाले, याचा अंदाज येऊ शकलेला नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com