esakal | आता गावागावांत ‘ग्रामदक्षता समित्या’; अवैध वाळू उपशावर नियंत्रणासाठी आदेश 

बोलून बातमी शोधा

sakal impact}

ग्रामदक्षता समितीने दर पंधरा दिवसांनी एक बैठक घेणे आवश्यक असेल. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन, साठा व वाहतूक होत असेल तर त्यावर आळा व नियंत्रण ठेवण्याचे काम जबाबदारीने पार पाडावे.

आता गावागावांत ‘ग्रामदक्षता समित्या’; अवैध वाळू उपशावर नियंत्रणासाठी आदेश 
sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : जळगाव व जामनेर तालुक्यांत अवैध गौण खनिज उत्खनन, साठा व वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही तालुक्यांतील सर्व गावांमध्ये ग्रामदक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी काढले आहेत. 
‘सकाळ’ने नुकतेच अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडेही अवैध उत्खनन, साठा व वाहतुकीबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत, हे आदेश देण्यात आले आहेत. 

१५ दिवसांनी एक बैठक आवश्‍यक 
ग्रामदक्षता समितीने दर पंधरा दिवसांनी एक बैठक घेणे आवश्यक असेल. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन, साठा व वाहतूक होत असेल तर त्यावर आळा व नियंत्रण ठेवण्याचे काम जबाबदारीने पार पाडावे. ग्रामदक्षता समितीने पहिली बैठक घेतल्यानंतर सदर बैठकीचे इतिवृत्त सदस्य सचिव यांनी संबंधित तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालयास १५ मार्च २०२१ पर्यंत सादर करावे. पहिल्या बैठकीत अवैध गौण खनिजाबाबतची संपूर्ण तपशीलवार माहिती, फौजदारप्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतूद, भारतीय दंड संहिता १८६०. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४८ (सुधारित), सह खनिजे (विकास ब विनियमन) अधिनियम, १९५७ व त्याखालील नियमांतर्गत केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात यावी. ग्रामदक्षता समितीतील सदस्य व सदस्य सचिव यांनी सदर कामात हलगर्जीपणा, टाळाटाळ केल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाबाबत प्रचलित नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. 

..तर सरपंच अपात्र होणार 
ग्रामदक्षता समितीतील अध्यक्षांनी सदर कामात हलगर्जीपणा, टाळाटाळ केल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाबाबत जिल्हाधिकारी यांनी २१ जानेवारी २०१९ चे परिपत्रकात दिलेल्या निर्देशानुसार सरपंच अपात्रतेबाबतची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. याबाबत सदर आदेशाद्वारे संबंधित ग्राम समितीतील अध्यक्ष तथा सरपंच यांना अवगत करण्यात येत आहे. 

..अशी असेल समिती 
अध्यक्ष- ग्रामपंचायतींचे सरपंच 
सदस्य- ग्रामसेवक 
सदस्य- पोलिसपाटील 
सदस्य- कोतवाल 
सदस्य सचिव- तलाठी 

संपादन ः राजेश सोनवणे