गांजा तस्करीत चाळीसगाव कनेक्शन; पोलीसांनी तीन संशयितांना घेतेले ताब्यात 

दिपक कच्छवा
Saturday, 17 October 2020

या अमली पदार्थाच्या तस्करीत चाळीसगाव शहर व तालुक्यातील काही तरुण गुंतल्याचे यापूर्वीच उघड झालेल्या अनेक घडामोडींवरून दिसून येते आहे. 

मेहुणबारे : अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा, नागपूर शहर यांनी नुकताच पाच संशयितांकडून सुमारे १० लाख ८५ हजार ९७० रुपये किमतीचा ७२ किलो ३९८ ग्रॅमचा गांजा पकडला. यातील अटक केलेल्या पाच संशयित आरोपींपैकी तीन संशयित चाळीसगाव येथील असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गांजा तस्करीच्या मुळाशी जाऊन हे तस्करीचे रॅकेट उघड करण्याची मागणी होत आहे. 

आवश्य वाचा- मेळघाट-अनेर संचार मार्ग प्रस्ताव लागणार मार्गी !
 

चाळीसगाव तालुका चार जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. शहरातून दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ गेला आहे. या मार्गावरून दररोज राज्य, आंतरराज्य वाहतूक होत असते. त्यात, अवैध व्यवसायाशी संबंधित वाहनेही राजरोसपणे धावत असतात. या वाहतुकीतून गांजासारख्या अमली पदार्थाची तस्करी अनेक वर्षांपासून होत आहे. या अमली पदार्थाच्या तस्करीत चाळीसगाव शहर व तालुक्यातील काही तरुण गुंतल्याचे यापूर्वीच उघड झालेल्या अनेक घडामोडींवरून दिसून येते. या प्रकरणी राज्यासह परराज्यात चाळीसगावातील काही तरुणांच्या विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यातच चाळीसगाव शहरातही गेल्या सहा-सात वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गांजा विक्री होत असल्याचा बोलबाला आहे. हा गांजा थेट आंध्र प्रदेशातून येत असल्याची चर्चा असून, चाळीसगावहून तो नागपूर, इंदूर आणि इतर ठिकाणी तस्करी केली जात असल्याची चर्चा आहे. 

सूत्रधारांना अटक व्हावी 
आंध प्रदेशसह महाराष्ट्र पोलिसांनी गेल्या एक-दोन वर्षांत गांजा तस्करीचे जे काही गुन्हे उघडकीस आणले, त्यात चाळीसगावातील तरुणांची नावे पुढे आली आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी चाळीसगावात येऊन संशयितांवर कारवायादेखील केल्या आहेत. त्यातच तीन दिवसांपूर्वी नागपूरच्या अमली पदार्थविरोधी पथकाने एका कारमधून सुमारे ११ लाखांचा गांजा पकडला. ज्यांच्याकडून हा गांजा जप्त केला, त्या पाच संशयितांपैकी तीन जण चाळीसगावचे असल्याने चाळीसगावचे नाव पुन्हा राज्य पातळीवर गाजले आहे. नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयित हेच खरे सूत्रधार आहेत की त्यांच्यामागचा सूत्रधार आणखी कोणी आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. 
 
कोट्यवधी रुपयांची उलाढाल 
नागपूर पोलिसांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा तस्करी उघड झाल्याने आणि त्यात, जळगाव जिल्ह्याचे नाव आल्याने नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी या प्रकरणात सखोल तपास करून गांजा तस्करीचे कनेक्शन समोर आणण्याची गरज आहे. गांजा तस्करीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून, त्यात बडे मासे सामील असल्याचे स्पष्ट आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi newे Chalisgaon youths involved in cannabis smuggling case were arrested by the police