बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव; हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त !

उमेश काटे
Wednesday, 11 November 2020

कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असून, यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहेत.

वावडे (ता. अमळनेर) : परतीच्या पावसाने झोडपल्याने हातातोंडाशी आलेले कपाशीचे पीक पूर्णपणे वाया गेले तर आता मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस पीकदेखील उद्ध्वस्त होत आहे. अमळनेर तालुक्यातील शेतकरी बोंडअळीमुळे मोठ्या आर्थिक कोंडीत सापडल्याचे चित्र असून, पुरता खचून गेला आहे. 

आवश्य वाचा- भुसावळात नूतन ‘डीवायएसपीं’ची धडक कारवाई; अनेक गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या !

कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असून, यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहेत. पीक व्यवस्थापनाविषयी अपुरे ज्ञान व त्यात कृषी विभागाची शेतकऱ्यांप्रति उदासीनता कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. शिवाय, बोगस बीटी बियाण्यांची चर्चा होत आहे. कपाशीचे पीकही हातचे गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यांची दिवाळी अंधारातच जाणार असे सध्यातरी दिसत आहे. 

कृषी विभागाकडून मार्गदर्शन 
बोंडअळीची समस्या निर्माण होऊन चिंताजनक परिस्थिती आली असताना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शनपर शिबिरे राबविली जात आहेत. नुकसान होत असलेल्या क्षेत्राची पाहणी वेळीच करावी, असे शासनाचे निर्देश आहेत. 

वाचा- ‘तापी मेगा रिचार्ज स्कीम’ला मोठ्या निधीची गरज !  

साडेचार एकर शेतात कपाशीची लागवड केली होती; परंतु कापूस वेचणीच्या वेळी परतीचा पाऊस आल्याने बोंडे सडली आहेत. आता बोंडअळी लागून संपूर्ण बोंडाला कीड लागली. गेल्या वर्षी आतापर्यंत ५५ क्विंटल कापूस घरी आला होता. या वर्षी मात्र दहा क्विंटल कापूस निघाला. बोंडअळीमुळे पऱ्हाटी काढून घेण्याची वेळ आली आहे. 
-विश्वास पाटील, शेतकरी, वावडे 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner infestation of bollworm on Bt cotton