भुसावळात नूतन ‘डीवायएसपीं’ची धडक कारवाई; अनेक गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या !

चेतन चौधरी 
Wednesday, 11 November 2020

सुमारे २५ हिस्ट्रिशीटर तपासून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय या कारवाईदरम्यान तीन दारूअड्ड्यांवर छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भुसावळ : शहरात सातत्याने वाढणारी गुन्हेगारी ठेचण्यासाठी पोलिस प्रशासन कसोशीने कामाला लागले आहे. दोन दिवसांपूर्वी आरपीडी रोडवर झालेली गोळीबाराची चर्चा व सर्चिंगमध्ये दरोड्याच्या प्रयत्नातील आरोपी आढळल्यानंतर पोलिसांनी शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविले. शहर, बाजारपेठ व तालुका पोलिस ठाणे हद्दीत पोलिस अधिकाऱ्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चाचपणी केली, तसेच वॉरंटवर हजर न राहणाऱ्या अनेक आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 

आवश्य वाचा- कोरोना’लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरला !
 

शहरात गेल्या काही वर्षांपासून अवैध शस्त्रांचा वापर करून होणाऱ्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दखलपात्र गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी शहरात मंगळवारी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. या कारवाईत शहरातील मागील दहा वर्षांत अवैध शस्त्रांचा वापर करून गुन्हे करणाऱ्या सुमारे १२० जणांची घरझडती घेण्यात आली. कारवाईदरम्यान शहरातील विविध गुन्ह्यांत फरारी असणाऱ्या सुमारे ६० गुन्हेगारांचा शोध घेतला. त्यांपैकी, मोहंमद इम्रानअली अब्बासअली, रामअवतार रघुनाथ लोधी, एक महिला आरोपी मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या नेतृत्वात विविध पथके तयार करून ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. 

तडीपार अटकेत 
याशिवाय संपूर्ण शहरातील तडीपार गुन्हेगारांची तपासणी केली असता, एक तडीपार शम्मी प्रल्हाद चाबरिया मिळून आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणारे शेख रईस शेख रशीद, सोहेब खान कलीम खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

दारूअड्ड्यांवर छापे 
शहरातील सुमारे २५ हिस्ट्रिशीटर तपासून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय या कारवाईदरम्यान तीन दारूअड्ड्यांवर छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्री उशिरा दुकाने सुरू ठेवणाऱ्या सुमारे सहा दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. त्यात जाफर रज्जाक गवळी, सद्दाम शेख गफ्फार, मनोज अशोक दास्ताने यांचा समावेश आहे. 

वाचा- ‘तापी मेगा रिचार्ज स्कीम’ला मोठ्या निधीची गरज !  
 

२३२ वाहनचालकांवर कारवाई 
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान २३२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांपैकी ३६ वाहने विनाक्रमांकाची होती. त्यांपैकी तीन संशयित मोटारसायकली पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत. याशिवाय, विविध रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशीसाठी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal DySP's combing operation in bhusawal city led to the arrest of several accused