पाण्याच्या दरात दुधाची विक्री 

किशोर पाटील
Sunday, 20 September 2020

दुग्ध व्यवसाय हा शेती परक म्हणून पारंपारिक पद्धतीने अनेक वर्षांपासून केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून संकरित गाईचे पालन करून दुग्ध व्यवसाय नव्याने उभा राहिला‌. त्यामुळे आज तालुक्यात शेकडो गाईचे पालन करून हा व्यवसाय केला जातो.

वावडे (ता. अमळनेर) : कोरोना संसर्गामुळे घसलेले दुधाचे दर, खरेदी-विक्री व्यवहारासाठी बंद असलेले जनावरांचे बाजार व वाढत असलेला पशुखाद्य व चाऱ्याचा खर्च, यामुळे पशुपालक अडचणीत सापडला असून, दूध अक्षरश: पाण्याच्या दरात विकावे लागत आहे. या व्यवसायात दुधाचे उत्पन्न खर्चासाठी गेले तरी जनावरांपासून मिळणारे शेणखत हमखास फायद्याचे ठरते. मात्र सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे दूध व शेणखत दोन्ही तोट्यात चालले आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायिकांसमोर मोठे आर्थिक कोडे उभे राहिले आहे. 

दुग्ध व्यवसाय हा शेती परक म्हणून पारंपारिक पद्धतीने अनेक वर्षांपासून केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून संकरित गाईचे पालन करून दुग्ध व्यवसाय नव्याने उभा राहिला‌. त्यामुळे आज तालुक्यात शेकडो गाईचे पालन करून हा व्यवसाय केला जातो. याशिवाय दुग्धजन्य पदार्थ निर्मिती केली जात आहे. मात्र, महामारीत दुधाचा खप कमी झाल्यामुळे दर वेगाने कमी झाले. पुढे खरेदी-विक्री बाजार बंद झाल्यामुळे शेतकरी पूर्ण अडचणीत आला. त्यामुळे या व्यवसायासाठी गुंतवलेले भांडवल, चारा, पशुखाद्य यांचा खर्च अशा बाबतीत आर्थिक गणित करता पशुपालकांना दुधाचा उत्पन्नाबरोबर शेनाचे उत्पन्नही हाती लागत नाही. 

शेतकऱ्याची विस्कटली घडी 
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र, सध्या घसरत्या दराने हा व्यवसायही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी पशुपालक अडचणीत आला आहे. सध्या एक लिटर पाण्याच्या बाटलीपेक्षा स्वस्त दूध विकण्याची वेळ पशु पालकांवर आली आहे. परिस्थिती सावरण्यासाठी अनेक तरुण दुग्ध व्यवसायाकडे वळले. परंतु कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायाची घडीच विस्कटली आहे. सध्या २० ते २२ रुपये प्रति लिटर इतका कमी दर मिळत आहे. या दराने पशुपालक शेतकऱ्यांचा खर्चही भागत नाही. लॉकडाउनपूर्वी दुधाला साधारण ३० ते ३५ रुपये प्रतिलिटर दर मिळत होता. 

‘मे महिन्यापर्यंत दुधाला बऱ्यापैकी भाव होता. त्यानंतर मात्र दुधाचे भाव उतरले. पाण्याच्या बाटलीपेक्षाही दुधाचे भाव कमी झाल्याने शेतकरी दूध उत्पादक अडचणीत आले आहे. त्यातच जनावरांच्या खाद्यासाठी लागणारा खर्चही अधिक असल्याने दूध व्यवसाय करायचा की नाही, असा प्रश्न पडू लागला आहे. 
- वासुदेव पाटील, दूध उत्पादक शेतकरी, अमळनेर 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner milk rate down in corona virus pried