अधिकाऱ्यांनी वंचित कर्मचाऱ्यांची दिवाळी केली आनंदी 

उमेश काटे
Thursday, 12 November 2020

कोरोनाचे रुग्ण हाताळणे आदी कामे करत आहेत आणि अकरा महिन्यात त्यांना ग्रामीण रुग्णालयाचे मानधन मिळाले नव्हते. त्यांना अधिकारी वर्गाकडून प्रत्येकी पाच हजार रुपये मदत देण्यात आली.

अमळनेर : कोरोनाच्या काळात ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे व्रत अंगीकारून स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी म्हणून अधिकाऱ्यांनी एकत्र येत स्वतःच्या पदरातून फंड गोळा करून मानधनपासून वंचित कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. या मदतीमुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी आता गोड झाली आहे. 

आवश्य वाचा- लॉकडाउनमध्ये रेल्वेने बदलला उत्पन्नाचा ‘ट्रॅक’ ! -

 

ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मदत करणारा रउफ मेहतर व अशोक सोनवणे यांनी कोरोनात मृत्यू झालेल्या रुग्णांना प्लास्टिक कागदात गुंडाळून बंद करणे, कोरोनाचे रुग्ण हाताळणे आदी कामे करत आहेत आणि अकरा महिन्यात त्यांना ग्रामीण रुग्णालयाचे मानधन मिळाले नव्हते. त्यांना अधिकारी वर्गाकडून प्रत्येकी पाच हजार रुपये मदत देण्यात आली. त्याचप्रमाणे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरून दवाखान्यात आणणे आणि घरी सोडण्यासाठी खासगी लक्झरी बसवर एसटी महामंडळाचे सचिन बाळकृष्ण पाटील, सुनील देवरे यांनी बंद काळात सेवा दिली. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येऊन त्यांनी मानधनाची अपेक्षा न करता धोका पत्करला. त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात आले. प्रियंका लधानी या एमएस्सीच्या विद्यर्थिनीने सेवा म्हणून रुग्णांच्या स्वॅब घेण्याचे कार्य केले. तिलाही साडेसात हजारांची मदत करण्यात आली तर ऑनलाइन डेटा भरण्यासाठी अक्षय सातपुते, नितीन पाटील यांनीही प्रत्येकी सात हजार रुपये दिवाळीच्या काळात आनंदासाठी देण्यात आले. 

देणाऱ्याने देत जावे.. 
मदतीसाठी अधिकारी वर्गाकडून प्रत्येकी पाच हजार रुपये मदत देण्यात आली आहे. सुमारे दीड लाख जमा करण्यात आले. या अधिकाऱ्यांमध्ये प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, संजय चौधरी, डॉ. गिरीश गोसावी, डॉ. प्रकाश ताडे, डॉ. संदीप जोशी, डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर, डॉ. जी. एम. पाटील, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालिका विभागप्रमुख, आरोग्य कर्मचारीच समावेश आहे. या सर्वांनी एकत्र येत अधिकारी फंड जमा करून जोखीम घेणाऱ्या मानधनापासून वंचित सेवेकऱ्यांना दिवाळीचा गोडवा दिला आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner Officials make diwali sweet by disguising deprived employees