
जळगावःमंजूर निधी १३५ कोटी..खर्च केवळ २४ कोटी
अमळनेर: राज्य शासनाच्या (State Government) वतीने यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) पाडळसरे धरणासाठी (Padalse Dam) १३५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असला तरी १० महिन्यात केवळ २४ कोटी खर्च झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आता उरलेल्या दोन महिन्यात उरलेला १११ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची कसरत करावी लागणार आहे. अन्यथा उर्वरित निधी परत गेल्यास याला कोण जबाबदार असा सवाल आता सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
येथील पाडळसरे धरण जन आंदोलन संघर्ष समिती तर्फे आज निम्न तापी प्रकल्पचे अधिकारी कार्यकारी अभियंता मु. शा. चौधरी यांची भेट घेण्यात आली. शासनाच्या मंजूर १३५ कोटींच्या निधी पैकी खर्चिक निधी बाबत विचारणा केली असता यंदाच्या वर्षात आतापर्यंत केवळ २४ कोटी खर्च झाल्याचे वास्तव समोर आले. मंजूर निधी व मागिल बाकी निधी तातडीने मिळावा आणि या मार्चपर्यंत खर्च करण्यात यावा अशी आग्रही मागणी समितीने प्रशासनाला यावेळी केली असली तरी कामाला गती देण्याची कसरत मात्र यंत्रणेला करावी लागणार आहे. पाडळसरे धरण जन आंदोलन संघर्ष समिती तर्फे निम्न तापी प्रकल्प कार्यालयाला प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.
नविन कार्यकारी अभियंता मु.शा.चौधरी यांना निम्न्न तापी प्रकल्पाचा कार्यभार संभाळल्याबद्दल याप्रसंगी धरण जनआंदोलन समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्यात तर सोबत सदर धरणासाठी केंद्र सरकारचा निधी उपलब्ध होणेबाबत कोणती कार्यवाही प्रशासनाच्या पातळीवर सुरू आहे याबाबत विचारणा केली.यावेळी धरण जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी,हेमंत भांडारकर, महेश पाटील,सुनिल पाटील,रणजित शिंदे, ऍड.तिलोत्तमा पाटील,गोकुळ बागुल,ऍड कुंदन साळुंके आदि प्रमुख पदाधिकारी यावेळी झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते. तसेच शासनातर्फे १३५ कोटींचा संपूर्ण निधी तातडीने उपलब्ध व्हावा याबाबत समिती लोकप्रतिनिधी यांचे कडे पाठपुरावा करणार आहे.