esakal | कोरोनाने कुंकू पुसलं..आणि जीवनच रुसलं; एकाच कुटुंबार आली वेळ

बोलून बातमी शोधा

deth
कोरोनाने कुंकू पुसलं..आणि जीवनच रुसलं; एकाच कुटुंबार आली वेळ
sakal_logo
By
उमेश काटे

अमळनेर ः तालुका हा पाठोपाठच्या "मृत्यूचा हॉटस्पॉट" आहे हे पुन्हा एकदा येथील एका घटनेने सिद्ध झाले आहे. दोधवद (ता.अमळनेर) येथे पिता पुत्रासह जावयाचा कोराना ने बळी घेतला आहे. एकाच कुटुंबातील तिन्ही कर्ते पुरुष गेल्याने कुटुंबासमोर दुःखाचा डोंगर उभा राहिला आहे. अशा विदारक परिस्थिती ग्रामस्थांनी एकजुटीने या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मदतीचा हात दिला आहे. कोराना ने कुंकू पुसलं... अन तिघांचं जीवनच रुसलं .. मात्र या स्वार्थी युगात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय या घटनेतून दिसून आला आहे.

हेही वाचा: ऑक्सिजन सिलिंडर मिळाली..आता डॉक्टरांसाठी प्रयत्न सुरू !

दोधवद येथील नामदेव वामन पाटील हे आपल्या पत्नी, एक मुलगा, दोन मुलीसह सून, जावई व नातवंडेसह राहत होते. मुलीचे लग्न झाल्यानंतर ते आपल्या सासरी नांदत होत्या. मात्र एका नंतर एका घटनेने या कुटुंबाची पूर्णपणे वाताहत झाली. सुरुवातीला जावई सुपडू भदाणे (रा.बोरकुंड ता.जि. धुळे) यांचे निधन झालं अन मोठी मुलगी मिनाबाई हिचे कुंकू पुसलं गेलं. कमी वयातच मुलीच्या जीवनात वैधत्व आले. दोन वर्षांपूर्वी नामदेव पाटील यांच्या पत्नी पुष्पबाई पाटील (वय-60) यांनी आजारपणातच या जगाचा निरोप घेतला. दुःखातून हे कुटुंब सावरत नाही तो पर्यंत कोरोना च्या दुसऱ्या लाटेने होत्याचे नव्हते केले. त्यांचे लहान जावई व धुळे जय हिंद महाविद्यालयाचे कर्मचारी विलास सुधाकर पवार (रा.न्याहलोद ता.जि. धुळे) यांचे 15 दिवसांपूर्वी कोरोना ने निधन झाले अन पुन्हा एकदा दुसरी मुलगी विद्याबाई हिचे कुंकू पुसलं गेलं. असा दुःखाचा डोंगर कोसळला असतांनाच नामदेव पाटील व प्रशांत नामदेव पाटील या दोघे पिता- पुत्र यांना देखील कोरोणा ची लागण झाली.

मृत्यूशी झुंज..

त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची गेल्या आठ-दहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरू होती. परंतु नियतीने पुन्हा एकदा घात केला. अन गेल्या मंगळवारी नामदेव पाटील (वय- 65) यांचे तर बुधवारी प्रशांत नामदेव पाटील (वय-42) या पिता पुत्रांचा पाठोपाठ दुर्दैवी मृत्यू झाला. अगोदरच दोन्ही मुली कमी वयात विधवा झाल्या अन त्यात भर पडत सुनेचे ही कुंकू गेल्याने ती पण कमी वयात विधवा झाली. तिच्यावर आता तीन लहान मुलांची संगोपनाची जबाबदारी आली.

हेही वाचा: सातपुड्यातील आदिवासी करु लागले उत्तम शेती !

कुटूंबावर दुःखाचा डोंगर

दरम्यान यापूर्वी प्रशांत पाटील व त्याची पत्नी हे दोन्ही शेतमजुरी करून रोजंदारी ने काम करून स्वतःचा उदरनिर्वाह भागवत असत. त्यांचीकडे केवळ एकच बिघा शेती होती. आता तर कोरोनाने एकाच कुटुंबातील तिन्ही कर्ते पुरुष गेल्याने कुटुंबासमोर दुःखाचा डोंगर उभा राहिला आहे. लहान मुलांचा भविष्याचा तसेच उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला म्हणून सर्व गावकऱ्यांनी व गावाबाहेर कामा निमित्त नोकरीस असलेल्या सर्व तरुण मित्रमंडळींनी एकत्र येत या अत्यंत गरजू व गरीब अशा कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी आपापल्या परीने आर्थिक मदत गोळा करण्याचे कार्य सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे 60 हजार रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. यासाठी अमळनेर शहरातील देखील काही प्रतिष्ठित नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. स्वार्थी युगात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय या घटनेतून दिसून आला आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे