
जिल्हाधिकारी राऊत यांनीही ‘उभारी’साठी जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांचे कार्य व सेवाभावी संस्थांच्या योगदानाचे कौतुक केले.
अमळनेर : जिल्ह्यात ‘उभारी’ उपक्रमांतर्गत अतिशय चांगले काम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या पद्धतीने मदत करता येते, हे जळगाव जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थांनी दाखवून दिले असल्याचे गौरवोद्गार महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काढले. अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेने धार्मिक कार्यासोबतच सामाजिक जाणिवेतून ‘उभारी’या उपक्रमात भरीव योगदान दिले. या पार्श्वभूमीवर जळगाव येथील नियोजन सभागृहात विश्वस्त मंडळाचा सन्मानही करण्यात आला.
आवश्य वाचा- महामार्ग चौपदरीकरणातून दहा किलोमीटरचा टप्पा वंचित
जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, महसूल उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, कैलास कडलग, राजेंद्र कचरे, लक्ष्मीकांत साताळकर, विनय गोसावी, सीमा अहिरे, रामसिंग सुलाणे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, राजेंद्र वाघ, तुकाराम हुलवळे, तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या वेळी महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सहसचिव दिलीप बहिरम यांना सन्मानित केले. जिल्हाधिकारी राऊत यांनीही ‘उभारी’साठी जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांचे कार्य व सेवाभावी संस्थांच्या योगदानाचे कौतुक केले.
आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूंबाला मदत
आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपुष्टात येते. मात्र, सामाजिक जबाबदारी ठेवत प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी मंगळ ग्रह सेवा संस्थेला आवाहन केले. या आवाहनावरून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना मंगळ ग्रह सेवा संस्थेने चार छोट्या चक्क्या व शिलाई मशिन दिले.
संपादन- भूषण श्रीखंडे