esakal | गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल
sakal

बोलून बातमी शोधा

Girna Dam

गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल

sakal_logo
By
सुधाकर पाटील

भडगाव : संततधारेमुळे गिरणा पट्ट्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. दुसरीकडे गिरणा धरण (Girna Dam) सलग तिसऱ्या वर्षी शंभरीकडे आगेकूच करत असल्याने शेतकऱ्याच्या एका डोळ्यात अश्रू, तर दुसऱ्या डोळ्यात हसू पाहायला मिळत आहे. गिरणा प्रकल्प मंगळवारी (ता. २८) ८० टक्के भरले, तर पाणलोट क्षेत्रातील धरणातून दहा हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. गिरणा धरण सलग तिसऱ्यांदा शंभरीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे गिरणा पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी सकाळी धरणात ७७.५९ टक्के साठा होता. मात्र, पाण्याचा फ्लो सुरू असल्याने सायंकाळपर्यंत धरण ८० टक्क्यांवर आल्याचे गिरणा पाटबंधारे उपविभागीय (Girna Irrigation Department )अधिकारी हेमंत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: जळगाव मनपा;‘उड्डाण पदोन्नती रद्द’ मागेही कोटींची उड्डाणे !

हॅट्‌ट्रिककडे वाटचाल
गिरणा धरणाच्या बांधकामाला यंदा ५२ वर्षे पूर्ण झाली. धरण १९६९ पासून दहा वेळा शंभर टक्के भरले आहे. धरणाचे बांधकाम १९५९ मध्ये सुरू झाले. ते दहा वर्षांनी म्हणजे १९६९ ला पूर्णत्वास आले. त्यानंतर १९७३ ला पहिल्यांदा धरण शंभर टक्के भरले. त्यानंतर १९७६, १९८० मध्ये ते पूर्ण भरले. त्यानंतर चौदा वर्षांनी म्हणजेच १९९४ मध्ये धरणाने शंभरी गाठली. त्यानंतर पुन्हा धरणाने १० वर्षे ब्रेक मारला, तर २००४ पासून सलग तीन वर्षे धरण पूर्ण क्षमतेने भरले. मात्र, २००७ नंतर धरण शंभर टक्के भरायला एक तपापर्यंत वाट पाहावी लागली. धरण २०१९, २०२० सलग दोन वर्षे १०० टक्के भरले होते. आता तिसऱ्या वर्षीही १०० टक्के भरण्याची अपेक्षा आहे.

Girna Dam

Girna Dam

कालवेही झाले प्रवाही
मन्याड ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने गिरणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्याबरोबरच गिरणा नदीवरील जामदा बंधाऱ्यातून जामदा डावा व उजवा कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. याशिवाय दहीगाव बंधाऱ्यातून निम्न डावा कालव्यालाही पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काही पाझर तलावांचे पुनर्भरण करणे शक्य होणार आहे, तर नाल्यामध्ये पाणी जाऊन पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. मात्र, कालव्याशेजारील शेत महिनाभरापासून पूर्णपणे पाण्यात असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.


गिरणा पट्ट्यात हसू अन् आसूही
गिरणा धरणावर निम्म्या जळगाव जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. जिल्ह्याच्या सहा तालुक्यातील जवळपास ५७ हजार हेक्टर क्षेत्र गिरणा धरणाच्या पाण्याने भिजते, तर तब्बल चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल व धरगाव पालिकांसह १५८ ग्रामीण पाणीपुरवठा योजना गिरणा पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे गिरणा धरण भरत असल्याचा आनंद गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांना आहे. दुसरीकडे संततधारेमुळे खरीप पिके वाया गेल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात आसू पाहायला मिळत आहेत.


गिरणा धरणात ८० टक्के साठा असून, पाणलोट क्षेत्रातील धरणातून १० हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. असाच प्रवाह सुरू राहिल्यास धरण शंभरी गाठू शकते.
-हेमंत पाटील, गिरणा पाटबंधारे उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव

हेही वाचा: उत्तराखंडमधील दीदीहाट हिल स्टेशन आहे अतिशय सुंदर..!


गिरणा धरण दृष्टिक्षेपात
क्षमता : २१,५०० दशलक्ष घनफूट
मृतसाठा : ३,००० दशलक्ष घनफूट
उपयुक्त जलसाठा : १८,५०० दशलक्ष घनफूट
एकूण लाभक्षेत्र : ६९,००० हेक्टर
जळगाव जिल्ह्यातील एकूण लाभक्षेत्र : ५७,२०९ हेक्टर
जलसिंचनाचे फायदे मिळणारे तालुके : ०८
धरणावर अवलंबून पाणीपुरवठा योजना : १५८ ग्रामीण व पालिकेच्या ४ योजना


धरणाची सद्य:स्थिती
एकूण पाणीसाठा : १७,३५३ दशलक्ष घनफूट
उपयुक्त जलसाठा : १४,३५३ दशलक्ष घनफूट
पाण्याची सुरू असलेली आवक : १०,००० क्यूसेक

loading image
go to top