अरे बापरे...हतनूर धरणात 54 टक्के गाळ: साठवण क्षमता घटली ! 

Hatnur dam Storage capacity
Hatnur dam Storage capacity

भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणात तब्बल 54 टक्के गाळ साचला आहे. मेरी संस्थेने मार्च 2017 ला केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली होती. त्यानंतरही उपाययोजना न झाल्याने साठवण क्षमता कमी झाली असून, सध्या झालेल्या तुरळक पर्जन्यवृष्टीतही धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडावे लागत आहे. याचा परिणाम कृषी सिंचनावर होत आहे. 


मेरी संस्थेने सॅटेलाइटद्वारे हतनूर प्रकल्पातील गाळाचे सर्वेक्षण केले होते. त्याचा अहवाल जलसंपदा विभागाकडे पाठविला आहे. त्या अहवालानुसार हतनूर उभारणीपासून 35 वर्षांत धरणात 54.45 टक्के गाळ जिवंत साठ्यात आहे. "मेरी'ने 2007 ला केलेल्या सर्वेक्षणानुसार धरणातील मृतसाठ्यात 81 टक्के गाळ असल्याचे आढळले होते. वेळीच धरणातील गाळ उपसला असता, तर आज ही वेळ आली नसती. जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हतनूरवर ही परिस्थिती ओढवली आहे. 

 केंद्रीय मंत्र्यांचे आश्‍वासन हवेत 
लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हतनूरमधील गाळ उपसण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, ते हवेत विरले आहे. हतनूर धरणाची 388 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता आहे. त्यात 208 दशलक्ष घनमीटर गाळ साचल्याने प्रकल्पाची साठवण क्षमता केवळ 180 दशलक्ष घनमीटरवर आली आहे आणि तीच मोठी चिंतेची बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

कृषी सिंचनावर परिणाम 
धरणात गाळ साचत राहिल्याने त्याचा फटका कृषी सिंचनाला बसला आहे. धरण उभारणीपासून रब्बी व उन्हाळी पिकांसाठी 70 दशलक्ष घनमीटर पाणी धरणातून तापी नदी व कालव्याद्वारे सोडले जात होते. मात्र, ते कमी होऊन फक्त रब्बी हंगामासाठी 18 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे कृषी सिंचनास पाणी मिळत नसल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. धरणातून (औद्योगिक पुरवठा) बिगर सिंचनासाठी 94 दशलक्ष घनमीटर पाणी दिले जाते, अशीच परिस्थिती राहिल्यास कृषी सिंचन व उद्योगावर दुष्परिणाम होईल. 

दुर्मिळ संधी गमावली 
गेल्या वर्षी दुष्काळामुळे हातनूर धरण प्रथमच 28 वर्षांत कोरडेठाक पडले होते. याचा फायदा घेत धरणातील गाळाचा पूर्णपणे उपसा करता आला असता, त्या वेळी गिरीश महाजन जलसंपदामंत्री होते. मात्र, अंतर्गत वादामुळे दुर्लक्ष झाल्याने ही संधी हुकली. धरणात गाळाचा संचय होऊ नये व सहज उत्सर्जन होण्याच्या दृष्टीने 2006 पासून विस्तारित स्वरूपाच्या आठ दरवाजांचे काम सुरू केले होते. मात्र, हे काम अर्धवट बंद पडले आहे. अद्यापही या कामास सुरवात झालेली नाही. जलसंपदामंत्री असताना महाजन यांनी या प्रकल्पाकडे लक्ष दिले असते, तर धरणाच्या साठवण क्षमतेत वाढ झाली असती.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com