आयुध निर्माणी कामगारांचा अनिश्चित कालीन संप अटळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

गेल्या वर्षी सहा दिवस चाललेल्या संपानंतर सरकार व कर्मचारी पक्षांमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत मागील चार संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या लिखित आश्वासनांच्या आधारावर खासगीकरणाचा निर्णय रद्द करण्याचा प्रस्ताव कामगार फेडरेशनद्वारे देण्यात आला.

भुसावळ (जळगाव) : आयुधनिर्माणींचे निगमीकरण (खासगी भागीदारी) रद्द करण्याच्या मागणीसाठी भुसावळसह देशातील ४१ आयुधनिर्माणी, तसेच संरक्षण क्षेत्रातील अन्य संस्थांचे कर्मचारी बारा ऑक्टोबरपासून अनिश्चित कालीन संपावर जाणार आहेत. 
गेल्या वर्षी सहा दिवस चाललेल्या संपानंतर सरकार व कर्मचारी पक्षांमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत मागील चार संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या लिखित आश्वासनांच्या आधारावर खासगीकरणाचा निर्णय रद्द करण्याचा प्रस्ताव कामगार फेडरेशनद्वारे देण्यात आला. त्यावर संरक्षण सचिवांनी लिखित आश्वासन दिले होते, की संरक्षण उत्पादन विभागात आयुधनिर्माणींचे निगमिकरण करण्याचा कोणताही विचार सरकारचा नाही. त्यामुळे संप मागे घेण्यात आला होता; परंतु सरकारने कोविड-१९ च्या विषम परिस्थितीत आत्मनिर्भर भारतच्या नावाखाली देशातील संरक्षण क्षेत्रात विविध शस्त्र-अस्र पुरविणाऱ्या आयुध निर्माणींचा खासगी भागीदारीचा निर्णय घेतला. हा आयुधनिर्माणी कर्मचाऱ्यांचा घात असून, फॅक्टरी अधिनियम कायद्याचे उल्लंघन आहे. त्याच आधारावर संरक्षण सचिवांना संरक्षणच्या तिन्ही फेडरेशनच्या आदेशनुसार देशातील ४१ आयुध निर्माणींच्या महाप्रबंधकांना निवेदन देण्याचे निर्देश होते. त्यानुसार मंगळवारी (ता. २९) भुसावळ आयुधनिर्माणीत तिन्ही संलग्न युनियनद्वारे महाप्रबंधकांना निवेदन दिले. 
महाप्रबंधक यांच्या वतीने उपस्थित संयुक्त महाप्रबंधक निलाद्री विश्वास, विभागीय महाप्रबंधक बी देविचंद, श्रम कल्याण आयुक्त व कार्यप्रबंधक अंकित धुरकुरे, कनिष्ठ कार्यप्रबंधक मिराज अंजुम यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी सतीश शिंदे, किशोर चौधरी, नवल भिडे, राजकिरण निकम, दिनेश राजगिरे यांनी मनोगत व्यक्त केले. लक्ष्मण वाघ यांनी सूत्रसंचालन केले व एम. एस. राऊत यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी किशोर बढे, प्रवीण मोरे, कैलास राजपूत, अनिल सोनवणे, वसिम खान, चेतन चौधरी, हरीश इंगळे, महेंद्र वानखेडे, विजय साळुंखे, सूर्यभान गाढे यांच्यासह संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. 

जोरदार घोषणाबाजी 
सर्व कर्मचारी आज सकाळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत प्रशासन भवनावर गेले. तेथे प्रचंड घोषणाबाजी करीत कामगार युनियन (एआईडिईएफ), मजदूर युनियन इंटक (आयएनडिडब्लूएफ), आयुध निर्माणी कर्मचारी संघ (बीपीएमएस) चे अध्यक्ष व महासचिव यांनी संरक्षण सचिव- संरक्षण उत्पादन अनुभाग यांना महाप्रबंधक यांच्यामार्फत निवेदन दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal aayudh nirmani worker strike in october month