esakal | भाजप बैठकीत खडसे समर्थकांची घुसखोरी झाली पण..
sakal

बोलून बातमी शोधा

bjp meeting and eknath khadse

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर भाजपची शहर व तालुक्यात नेमकी स्थिती समजुन घेण्यासाठी लोणारी मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक कशी होते याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती.

भाजप बैठकीत खडसे समर्थकांची घुसखोरी झाली पण..

sakal_logo
By
श्रीकांत जोशी

भुसावळ (जळगाव) : भारतीय जनता पक्षाच्या गुरूवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत खडसे समर्थकांची घुसखोरी केली खरी, पण एका समर्थकाच्या बोलण्याला अगदी दहा- बारा लोकांनीच टाळ्या वाजविल्याने आपण येथे संख्येने मर्यादित असल्‍याची जाणीव झाल्यावर ते समर्थक शांत बसले.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर भाजपची शहर व तालुक्यात नेमकी स्थिती समजुन घेण्यासाठी लोणारी मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक कशी होते याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. कारण त्याआधी कार्यकर्त्यांना झालेल्या फोनाफोनीची चर्चा चांगलीच रंगली. बैठकीला उपस्थित राहु नका असे फोन गेल्याचे समजताच बैठकीला उपस्थित राहण्याबाबत आमदार संजय सावकारे यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. वरणगाव, मोंढाळा, साकरी, वराडसीम, साकेगाव, तळवेल, मांडवेदिगर, कठोरा आदी ग्रामीण भागातील पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. यात काही विद्यमान व माजी सरपंच यांचाही समावेश होता. 


भुसावळचे सुमारे 14 नगरसेवक उपस्थित होते. मात्र नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, प्रा. डॉ. सुनील नेवे यांची अनुपस्थिती अपेक्षित धरण्यात आली होती. बैठकीची वेळ सायंकाळी साडे सहाची असतांना आठ वाजता बैठक सुरू झाली. अर्थात तोपर्यंत हॉल कार्यकर्त्यांनी पुर्ण भरला होता. आमदार संजय सावकारे व त्यांचे बंधु प्रमोद सावकारे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी बैठक व्यवस्थेच्या नियोजनात जातीने लक्ष ठेवून होते. 

नेत्‍यापेक्षा कार्यकर्ता मोठा
जिल्‍हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी भाषणात नेत्या पेक्षा कार्यकर्ता कसा मोठा असतो हे प्रास्ताविकात सांगितले. नाथाभाऊ पक्ष सोडून गेल्याचे दु:ख जरुर आहे; पण कार्यकर्त्यांमुळेच पक्ष मोठा होतो. कोणा एका नेत्यामुळे नाही हे सांगायला ते विसरले नाही. शिवाय निरोप देऊनही बैठकीला अनुपस्थित राहिलेल्यांचा त्यांनी नाव न घेता समाचार घेतला. प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणीक यांनी हितगुज करण्यास सुरुवात केली; तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यात खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांनी आमच्या भागातील विकासकामांसाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही कामे करु. 

अन्‌ वाजल्‍या मोजक्‍याच टाळ्या
शहर कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणीची लवकर निवड करावी आदी मते नवलसिंग राजपूत, आनंदा ठाकरे, खुषाल जोशी यांनी व्यक्त केली. मात्र चंद्रशेखर अत्तरदे, प्रशांत निकम यांनी खडसे यांच्यावर झालेल्या अन्यायाचा मुद्दा मांडला. त्यावर काही मोजक्या टाळ्याही वाजवल्या त्यात निकम यांनी असा अन्याय आमच्या खासदार व आमदार यांच्यावर होऊ नये ही अपेक्षा व्यक्त केली. जे खडसे समर्थ आहेत त्यांनी भाजपच्या बैठकीत यायलाच नको होते; अशी कुजबूज मागील रांगेत बसलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top