esakal | ब्लॅकने ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शन विकणाऱ्या पॅथाॅलाॅजीचा काळाबाजार उघड

बोलून बातमी शोधा

remdesivir
ब्लॅकने ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शन विकणाऱ्या पॅथाॅलाॅजीचा काळाबाजार उघड
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, यावर प्रभावी असलेले ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांच्या मनःस्थितीचा गैरफायदा घेत या इंजेक्शनची काळ्या बाजारात अव्वाच्या सव्वा भावाने विक्री केली जात आहे. भुसावळला या इंजेक्शनची १५ ते २० हजारांत विक्री करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी (ता. २१) अटक केली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा: जळगाव शहरात आता मनपा तयार करणार ‘मायक्रो कंटेंटमेंट झोन’

राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. भुसावळ शहरातही हे इंजेक्शन उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे बद्री प्लॉटमधील ओम पॅथॉलॉजीमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनची तब्बल १५ ते २० हजारांत विक्री केली जात होती. याची पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केली. पोलिसांनी सापळा रचून संशयितांनी रुमालात गुंडाळलेले व एक फुटलेले इंजेक्शन आढळल्याने ते जप्त करण्यात आले. जप्त इंजेक्शनमध्ये ५४०० रुपयाला मिळणारे शंभर एमजीचे हॅड्रा कंपनीचे तीन व ३४०० रुपयाला मिळणारे रेमडीक कॅडीला कंपनीचे एक इंजेक्शन असे एकूण १९ हजार ६०० रुपयांचे इंजेक्शन जप्त करण्यात आले. पोलिसांना हॅड्रा कंपनीचे एक फुटलेले इंजेक्शन आढळले. पोलिसांनी लॅबचालक विशाल शरद झोपे (वय २८, बद्री प्लॉट, भुसावळ) व कर्मचारी गोपाळ नारायण इंगळे (वय १८, मानमोडी, ता. बोदवड) यांना अटक करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: परराज्यातून जळगावात येणाऱ्यांना..१४ दिवस होम क्वॉरंटाइन नियम

संशयितांनी आतापर्यंत या माध्यमातून ३० ते ३५ नागरिकांना या इंजेक्शनची विक्री केल्याचे समजते. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ, ईश्‍वर भालेराव, सचिन पोळ आदींच्या पथकाने कारवाई केली. बाजारपेठ पोलिसात फूड अँड ड्रग निरीक्षक अनिल माणिकराव यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

संपादन- भूषण श्रीखंडे