बुलेटस्‍वार चालले फटाके फोडत; ८७ हजाराचा दंड वसूल

चेतन चौधरी
Friday, 27 November 2020

शहरातील काहींनी बुलेटच्या सायलन्सरमध्ये बदल केल्यानंतर बुलेटचा जोरदार फटाक्यांसारखा आवाज निर्माण होइल, अशी व्यवस्क्षा केली आहे. या आवाजामुळे वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे.

भुसावळ (जळगाव) : भुसावळचा पदभार घेतल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शहरातील बेशिस्त वाहनधारकांना वठणीवर आणण्याचा चंग बांधला असून, त्यांच्या मनोदयाप्रमाणे धडक कारवाईदेखील होताना दिसत असल्याने शहरवासीयांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. शहर वाहतूक शाखेला नवीनच आलेले सहाय्यक निरीक्षक संदीप आराक यांनीदेखील वरिष्ठांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनधारकांवरही दंडात्मक कारवाई करून त्यांना वठणीवर आणले आहे. 
भुसावळ शहरात २४ व २५ नोव्हेंबर या दोन दिवसांत तब्बल ४१७ वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यात ८६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील काहींनी बुलेटच्या सायलन्सरमध्ये बदल केल्यानंतर बुलेटचा जोरदार फटाक्यांसारखा आवाज निर्माण होइल, अशी व्यवस्क्षा केली आहे. या आवाजामुळे वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे. शिवाय या प्रकारामुळे अपघात वाढण्याची शक्यताही होती. या अनुषंगाने पाच बुलेट जप्त करण्यात आल्या. त्यातील तीन बुलेटचालकांना १५ हजार ४०० रुपयांचा दंड सुनावण्यात आला, तर अन्य दोघा बुलेटबाबत आरटीओ जळगाव यांना अहवाल पाठविण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या तब्बल ९१ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. 

फॅन्सी नंबरप्लेट काढा
फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या तिघा दुचाकींसह २५ नंबरप्लेट खराब असलेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. तसेच ट्रीपल सीट २०, तसेच १०२ अन्य केसेस करण्यात आल्याचे आराक यांनी सांगितले. उपअधीक्षक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने सहाय्यक निरीक्षक संदीप आराक यांच्या नेतृत्वात १७ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबरदरम्यान पाच हजार ७३४ केसेसच्या माध्यमातून १२ लाख ३४ हजार आठशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, विनालायसन्स, ट्रीपल सीट, मोबाईलवर बोलून दुचाकी चालवणारे, हेल्मेटचा तसेच विनानंबरप्लेट व चित्र-विचित्र नंबरप्लेट असलेल्या वाहनधारकांसह अल्पवयीन वाहनधारकांवर धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal city traffic police action not rules follow