अतिवृष्टीमुळे उडीद, मुगाला फुटले कोंब 

mug
mug

भुसावळ : तालुक्यात मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे किन्ही, खडका, तळवेल, पिंपळगाव खुर्द, दर्यापूर सुनसगाव, वांजोळा, जोगलखेडा, पिंपळगाव बुद्रुक, वेल्हाळा, सुसरी आदी भागांत शेतामध्ये पाणी साचून उडीद, मूग, तूर, कपाशी, मका, कांदा, भुईमूग आदी उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. 
जोरदार पावसामुळे किन्ही, सुनसगाव वांजोळा जोगलखेडा खडका या ठिकाणी संततधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहे. या पावसामुळे मूग, उडीद, भुईमूग, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मूग व उडीद या पिकांच्या तोडणीस आलेल्या शेंगाना झाडावरच कोंब फुटले असून, ते पूर्णपणे खराब झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने आधीच हतबल झालेला शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. सलग तीन चार वर्षांपासून दुष्काळ, यातच कोरोना संकट, या दुहेरी संकटात आणखी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सुरवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे, खते यासाठी खर्च करून खरिपाची लागवड केली. 
 
पिकांना लागली कीड 
काही ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यातून जी पिके वाचली त्यांना युरिया आदी खते साठेबाजीमुळे वेळेवर उपलब्ध झाली नाही. अशातच सलग सहा, सात दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे या सर्व संकटातून वाचलेली उरली सुरली पिकेही डोळ्यांदेखत सडू लागली आहेत. 
 
शेतकरी आला मेटाकुटीस 
कायम निसर्गाने केलेल्या अवकृपेमुळे आधीच हतबल झालेला शेतकरी आता मेटाकुटीस आला आहे. अतिवृष्टीमुळे मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला असून, नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. 
 
सलग सहा सात दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागामार्फत सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना व तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केलेली आहे. 
- मंगेश पाटील, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com