कोरोना बळींमध्ये ८० टक्के पन्नाशी ओलांडलेले

चेतन चौधरी
Sunday, 14 June 2020

आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेलेले ६० टक्के रुग्ण हे ५० ते ८० या वयोगटातील असून, त्यांच्यात मधुमेह, हृदयविकार आदी जुन्या व्याधींची लक्षणे आढळल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

भुसावळ : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव भुसावळ शहरात दिसून येत आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भुसावळात कोरोना बाधितांचा आकडा तीनशेपार गेला असून, ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेलेले ६० टक्के रुग्ण हे ५० ते ८० या वयोगटातील असून, त्यांच्यात मधुमेह, हृदयविकार आदी जुन्या व्याधींची लक्षणे आढळल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, बाधित क्षेत्रात आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण करण्यात आले. यात २६, ९१७ घरांमध्ये १ लाख २४, ८०५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात बाधितांच्या संपर्कातील ७७३ हायरिस्क तर ९३६ लोरिस्क व्यक्तींची नोंद करण्यात आली. तर कोरोना बाधित मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ३३ वर्षीय एक रुग्ण वगळता, सर्व रुग्ण हे ४० वर्षांपुढील आहेत. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, बाधिताच्या संपर्कात आल्याने सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लागण होते. मात्र ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांच्यात लवकर लक्षणे दिसतात. अनेक ज्येष्ठांमध्ये जुन्या व्याधी असल्याने त्यांच्या लक्षणे अधिक तिव्रतेने आढळतात. त्यामुळे शक्यतो साठी ओलांडलेल्या तसेच जुन्या व्याधी असणाऱ्या नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. यात पुरुषांची सर्वाधिक २१ संख्या तर स्त्रीयांचे प्रमाण ११ आहे.

वयोगटानुसार मृत्यूचे प्रमाण
३३ वर्षीय एक रुग्णासह 
४० ते ५० वर्षीय : ५
५१ ते ६० वर्षीय : १४
६१ ते ७० वर्षीय : ६
७१ ते ८० वर्षीय : ६
अशा एकूण ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुरुषांचे प्रमाण अधिक
शहरात आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार ४४ ते ८२ वर्षे वयोगटातील रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधित मृत्यू हे ५० वर्षे ओलांडलेल्या नागरिकांचे झाल्याचे दिसते. वयस्क नागरिकांना लवकर लागण होऊन उपचारास विलंब झाल्यास मृत्यू ओढावू शकतो. दरम्यान, अनेक रुग्णांचा अहवाल मृत्यूनंतर कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मृतांमध्ये पुरुषांची सर्वाधिक २१ संख्या तर स्त्रीयांचे प्रमाण ११ आहे.

दाट लोकवस्त्यांचा समावेश
भुसावळात कोरोनाचा पहिला बळी २८ एप्रिलला पंचशील नगरातील ४५ वर्षीय महिला आणि रुपवते सोसायटीमधील ८२ वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला होता. शहरातील जाम मोहल्ला, मिल्लत नगर, लाल बिल्डींग, काझी प्लॉट, रामदास वाडी, गुंजाळ कॉलनी या भागांमधून सर्वाधिक ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर या खालोखाल शिवदत्त नगर, फालक नगर- ३, पंचशील नगर, गंगाराम प्लॉट- ३, समता नगर- २, भोई नगर २, जुना सातारा- २, शनि मंदिर वॉर्ड-१, सुखदेव नगर- १, राम मंदिर वॉर्ड-१, प्रोफेसर कॉलनी-१, सुंदर नगर-१ तर ग्रामीण भागातही सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal corona positive case death 80 percent old age