esakal | ‘ओला दुष्काळ’च्या आशेवर पाणी; आणेवारी ७० पैसे जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

‘ओला दुष्काळ’च्या आशेवर पाणी; आणेवारी ७० पैसे जाहीर

अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना नजर पैसेवारी ७० पैसे लागली आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाची आशा मावळली आहे.

‘ओला दुष्काळ’च्या आशेवर पाणी; आणेवारी ७० पैसे जाहीर

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ: तालुक्यात यावर्षी तब्बल ५९६.८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्‍यात सरासरी १३५ टक्के पाऊस पडला असूनही तब्बल ७० पैसे नजरपैसेवारी लावण्यात आली आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाची आशा संपुष्टात आली आहे. अतिपावसामुळे पिके हातची गेली आहे. तरीही तालुक्‍यात ७० पैसे नजर पैसेवारी लावण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. 

आवर्जून वाचा- केंद्र, राज्याच्या टोलवाटोलवीत ‘केळी पीकविमा’लालफितीत 
 

अतिवृष्टीने प्रचंड नुकसान 
अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना नजर पैसेवारी ७० पैसे लागली आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाची आशा मावळली आहे. तरीही अद्याप सुधारित व अंतिम पैसेवारीमध्ये सुधारणा करण्यात यावी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावर्षी ज्वारी, मका, उडीद, मूग या पिकांच्या पेरणी क्षेत्रात सरासरी वाढ झालेली आहे. तसेच कपाशीचे क्षेत्रही वाढले आहे. ज्वारी २६५१, मका १८६६, मूग ८९३, उडीद १०५०, सोयाबीन २३८३ तर कापूस १५९५१ हेक्‍टर अशी पेरणीची नोंद आहे. 
 

केळीलाही बसला फटका 
तालुक्‍यात मुगाची पेरणी ८९३ हेक्‍टरवर करण्यात आली आहे. त्यातील ५०३ हेक्‍टर वरील मुगाचे नुकसान झाले आहे. उडदाची पेरणी १०५० हेक्‍टरवरकरण्यात आली आहे. त्यातील ३०४ हेक्‍टरवर पिकांचे नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यातून दिसून आले आहे. तर केळीचेही नुकसान होत असून तालुक्‍यात एकशे पाच शेतकऱ्यांच्या ५५ हेक्‍टर वरील केळीचे पंचनामे करण्यात आले आहे. तालुक्यात एकंदरीत ८३३ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे सहाय्यक कृषी अधिकारी , ग्राम विकास अधिकारी ब तलाठी यांच्या संयुक्त पथकाने केली असल्याची माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी धनंजय पोळ यांनी दिली आहे. ३३ टक्‍के पेक्षा जास्त नुकसान असलेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

आवश्य वाचा- सातपुड्यातील पाड्यांवरील शेकडो बालके पोषण आहारापासून वंचित 
 

सलग दुसऱ्या वर्षीही नुकसान 
गेल्यावषीही परतीच्या पावसाने दिवाळीपर्यंत हाहाकार माजवला होता. त्यामुळे गेल्या वर्षी उडीद , मूग, सोयाबीन, ज्वारी, मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. तीच परिस्थिती पुन्हा दुसऱ्या वर्षीही उद्रभवल्यामुळे शेतकरीवर्ग पुन्हा संकटात सापडला आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image