esakal | हतनूरचे ४१ दरवाजे उघडले;८२ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

हतनूरचे ४१ दरवाजे उघडले;८२ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

हतनूरचे ४१ दरवाजे उघडले;८२ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

sakal_logo
By
चेतन चौधरी


भुसावळ : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणात (Hatnur Dam) पाण्याचा साठा वाढला आहे. यामुळे आज दुपारी एकच्या सुमारास हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी (Citizen Alert) सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यामुळे दर सेकंदाला धरणातून ८२ हजार २७८क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातून म्युकरमायकोसिस हद्दपारीच्या दिशेने


तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यात हतनूर धरण क्षेत्रात काल (ता.७) सकाळपासून दमदार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे हतनूर धरण हे पूर्ण भरले आहे. त्यामुळे धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. आज (ता. ८) दुपारी १ वाजेच्या सुमारास तापी नदीपात्रात ८२ हजार २७८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. परिणामी, तापी नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, तापी नदीकाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा: रस्ता बंद..म्हणून पतीने खांद्यावर पत्नीला उचल्ले, पण वाटेतच मृत्यू


नदीपात्रात गुरेढोरे न सोडण्याचे आवाहन

गेल्या काही तासांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हतनूर धरणाच्या लगतच्या गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये. तसेच कोणीही नदी पात्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये आणि नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

हेही वाचा: चाळीसगाव पुराच्या कटू आठवणी..पुन्हा आठव्या दिवशी


पुर्णा नदीतून पाण्याचा विसर्ग सोडणार

पुर्णा नदीतुन सुमारे ४ लक्ष क्युसेस पाण्याचा विसर्ग आज सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेच्या दरम्यान सोडण्यात येणार आहे. त्यामुळे हतनुर धरणाखाली नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.यासाठी नदीकाठच्या गावातील गावकऱ्यांनी नदीपात्राकडे जाऊ नये. तसेच आपली गुरे ढोरे नदी पात्रात जाणार नाही, तसेच नदीपात्रावरील व नदीपात्रालगतची आपली शेती उपयोगी साहित्य, पशुधन सुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी.

loading image
go to top