esakal | महानिर्मितीस अब्जावधींचा झटका...मागणी अभावी राज्यातील तीन संच बंदच
sakal

बोलून बातमी शोधा

महानिर्मितीस अब्जावधींचा झटका...मागणी अभावी राज्यातील तीन संच बंदच

मागणीनुसार वीजनिर्मितीसाठी आम्ही सज्ज आहोत. सध्या मागणी नसल्याने वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे. पुढील परिस्थिती लक्षात घेऊन मागणी वाढल्यास वीजनिर्मिती केंद्र सुरू करण्यात येईल. 
-पंकज सपाटे, मुख्य अभियंता, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र

महानिर्मितीस अब्जावधींचा झटका...मागणी अभावी राज्यातील तीन संच बंदच

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आल्याचे दूरगामी परिणाम विविध क्षेत्रात दिसून येत आहे. राज्यातील उद्योग शटडाउन असून, विजेच्या मागणीत विक्रमी घट झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील भुसावळसह नाशिक, परळी वीज निर्मिती केंद्र बंद आहेत. त्यामुळे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले असून, यात केवळ दीपनगर वीज निर्मिती केंद्रालाच ५ अब्ज ६५कोटी ८९ लाख ६० हजारांचे नुकसान झाले आहे. 

देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यामुळे सर्वच उद्योगधंदे, कारखाने रेल्वे वाहतूक बंद आहे. याचा फटका वीजनिर्मिती केंद्रांना बसला आहे. महानिर्मितीच्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रासह चंद्रपूर, परळी, नाशिक येथील सर्व संच बंद होते. तर कोराडी, खापरखेडा व पारस या तीन वीजनिर्मिती केंद्रातून सुमारे तीन हजार मेगावॅट वीजनिर्मिती सुरु होती, आता यातील चंद्रपूर केंद्र पुन्हा सुरू झाले असून, भुसावळ, परळी, नाशिक हे केंद्र मात्र अद्यापही बंदच आहेत. 

दिवसाला पाच कोटी ६५ लाखांचे नुकसान 
दीपनगर विद्युत केंद्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. दीपनगर वीज निर्मिती केंद्राचे एका दिवसाला पाच कोटी ६५ लाख ८९ हजार सहाशे रुपयांचे नुकसान होत आहे. यानुसार गेल्या शंभर दिवसांपासून दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्र बंद असल्यामुळे ५ अब्ज ६५कोटी ८९ लाख ६० हजारांचे नुकसान झाले आहे. 


तिन्ही संच बंद 
शहराला लागून असलेल्या दीपनगर वीज निर्मिती केंद्रात ५०० मेगावॅट वीज निर्मितीचे दोन, तर २१० मेगावॅट निर्मितीचा एक संच आहे. येथून जळगाव, धुळे, बुलढाणा व काही प्रमाणात नाशिक त्याचप्रमाणे शेजारील गुजरात आणि गोवा राज्यात देखील मागणीनुसार विजेचा पुरवठा केला जातो. त्यामुळे १२१० मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येते. देशात संचारबंदी लागू झाली तेव्हापासून विजेची मागणी बंद झाली आहे. त्यामुळे वीज निर्मिती केंद्रातील पाचशे मेगावॅटचे दोन्ही संच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे एक हजार मेगावॅट वीज निर्मिती बंद आहे. 


 

loading image