भुसावळ येथील भाजपच्या बैठकीत नगराध्यक्षांसह नगरसेवक गैरहजर !

चेतन चौधरी 
Friday, 30 October 2020

भाजप हा विचारधारेवर चालणार पक्ष आहे, येथे कुणाला काय मिळाले किंवा नाही मिळाले, याचा विचार केला जात नाही. फक्त राष्ट्र प्रथम या विचारसरणीवर कार्यकर्ते काम करतात.

भुसावळ: भाजपचे जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपला राम राम केल्यानंतर भाजपला मोठी खिंडार पडेल अशी चर्चा सद्या सुरू आहे. त्यात भाजपकडून ड्यामेज कंट्रोलच्या बैठका सुरू असून भुसावळ येथे गुरूवारी भाजपची झालेल्या बैठकीत भाजपचे नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक उपस्थित नसल्याने र्चेचेला उधाण आले आहे.  

आवश्य वाचा- सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी खासदार झाले- खासदार रक्षा खडसे 

भुसावळ येथील लोणारी मंगल कार्यालय भाजपचा भुसावळ विधानसभा मेळावा झाला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करतांना ते बोलत होते. प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, विभागीय संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, प्रदेश चिटणीस खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर, डॉ. राजेंद्र फडके, सरचिटणीस विजय धांडे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील उपस्थित होते. दरम्यान, माजी मंत्री गिरीश महाजन मुंबईला गेल्याने ते उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. 

भाजप विचारधारेवर चालणारा पक्ष आहे- भोळे

भाजप हा विचारधारेवर चालणार पक्ष आहे, येथे कुणाला काय मिळाले किंवा नाही मिळाले, याचा विचार केला जात नाही. फक्त राष्ट्र प्रथम या विचारसरणीवर कार्यकर्ते काम करतात. राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा शिवसेना हे सर्व पक्ष घराणेशाहीला बांधिल आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या पक्षांमध्ये फारसा वाव नसतो. मात्र, भाजप असा पक्ष आहे, येथे चहा विकणारा व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो, तसेच कोणताही कार्यकर्ता पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने भाजपमध्ये लोकशाही आहे. ज्या काँग्रेसने सत्तर वर्षांत केले नाही, ते नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांत केले आहे. राम मंदिरापासून राष्ट्रनिर्मितीपर्यंत नरेंद्र मोदी काम करीत असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. 

...तरच विस्तार : काळकर 
भाजप राष्ट्रहित आणि जनसेवेला प्राधान्य देणारा पक्ष आहे. त्यामुळे काम करताना संघटना मजबूत करणे आवश्यक आहे. पक्षाचे हित त्यात माझे हित आहे, अशी प्रत्येकाची भावना पाहिजे. तरच पक्षाचा विस्तार होऊन जनसेवेचे कार्य घडू शकेल, असे संघटनमंत्री किशोर काळकर यांनी सांगितले. 

 
नगराध्यक्षांसह नगरसेवक गैरहजर 
बैठकीत नगराध्यक्ष रमण भोळे, सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, वसंत पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन, बापू महाजन, नगरसेवक बोधराज चौधरी, भाजप गटनेते मुन्ना तेली गैरहजेर होते. याबाबत जिल्हाध्यक्ष भोळे यांना विचारणा केली असता, त्यांचे राजीनामे आलेले नाहीत. मात्र गैरहजर असल्याचा ते खुलासा करतील. त्यांची समजूत काढू, मात्र त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय केला असल्यास त्यावर जबरदस्ती करू शकत नाही. लोकशाहीत कुणीही आपला पक्ष निवडू शकतो, असेही श्री. भोळे यांनी स्पष्ट केले. 

आवर्जून वाचा- सत्ताकेंद्र स्वत:कडे राखण्यात गुलाबरावांची कसोटी !
 

...यांची होती प्रमुख उपस्थिती 
माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक पिंटू कोठारी, मनोज बियाणी, जिल्हा परिषदेच्या सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे, परीक्षित बरहाटे, पवन बुंदेले, डॉ. नितू पाटील, वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे आदी उपस्थित होते. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal many councilors including the mayor of bhusawal were absent from the BJP meeting