
बोदवड बाजार समितीमधून सीसीआय खरेदी केंद्रावर रत्नाबाई दिलीप माळी (रा. बोदवड) यांनी गुरुवारी (ता. १०) दोन हातगाड्यांवर कापूस विक्रीसाठी आणला होता.
बोदवड (जळगाव) : शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ‘सीसीआय’च्या केंद्रावर सध्या कापूस खरेदी सुरू आहे. या ठिकाणी खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या गाडीमधील अंदाजे ७५ किलो कापूस चोरट्याने लंपास केला.
नक्की वाचा- हृदयद्रावक..साई पुजेसाठी महिलेचा मंदिरात प्रवेश; पुजाऱ्याचा मृतदेह पाहून आरडाओरड
बोदवड बाजार समितीमधून सीसीआय खरेदी केंद्रावर रत्नाबाई दिलीप माळी (रा. बोदवड) यांनी गुरुवारी (ता. १०) दोन हातगाड्यांवर कापूस विक्रीसाठी आणला होता. शनिवारी व रविवारी खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचा मुलगा विशाल माळी हा रखवालीसाठी कापसाच्या गाडीजवळच थांबला होता. तो शनिवारी रात्री अकराच्या सुमारास जेवणास गेला असता अज्ञात चोरट्याने गाडीच्या मागील बाजूस गोण्या फाडून कापूस लंपास केला. जेवण करून परत आल्यावर चोरी झाल्याचे विशालच्या लक्षात आले. यात अंदाजे ५० ते ७५ किलो कापूस चोरीस गेला आहे.
बाजार समितीचे हात वर
या प्रकरणी बाजार समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर शेतकऱ्याने आपली कैफियत मांडली असता त्या शेतकऱ्याला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. बाजार समितीला चारही बाजूने संरक्षकभित असून, तेथे रखवालदारही आहे. असे असूनही चोरी झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. बाजार समिती प्रशासनाने रखवालदारांची संख्या वाढवून शेतकऱ्यांच्या मालाचे योग्य पद्धतीने संरक्षण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
संपादन ः राजेश सोनवणे