
बोरअरवेलसाठी आवश्यक ४४० व्होल्टेजच्या या पेटीमधुन विद्युतगळती होत झाडामध्ये आणि खाली विद्युत प्रवाह उतरला असतांना सकाळी काकड आरतीला आलेल्या पुजारींना कल्पना नसल्याने ते थेट बोअरवेल सुरु करण्यासाठी गेले
जळगाव : जुना खेडी रेाड तुळजाईनगरातील साई गणेश मंदिराचे पुजारी अनुपम मोहन प्रसाद यादव(वय-२५) यांचा विद्युत झटक्याने मृत्यु झाला. साई आरतीपुर्वी मंदिर स्वच्छ करण्यासाठी बोअरवेल सुरु करण्यासाठी गेले असतांना त्यांना जबरदस्त शॉक लागल्याने जागीच गतप्राण झाल्याचे परिसरातील रहिवाशांनी बघितले. शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अख्त्यारीत असलेल्या उद्यानातील बोअरवेलची पेटी चक्क उंबराच्या झाडावर लावली आहे. दिवसभर पाऊस झाल्याने झाडाखाली चिखल व ओलावा हेाता. बोरअरवेलसाठी आवश्यक ४४० व्होल्टेजच्या या पेटीमधुन विद्युतगळती होत झाडामध्ये आणि खाली विद्युत प्रवाह उतरला असतांना सकाळी काकड आरतीला आलेल्या पुजारींना कल्पना नसल्याने ते थेट बोअरवेल सुरु करण्यासाठी गेले आणि जोरदार विद्युत झटका लागून त्यांचा जागीच मृत्यु झाला.
काकडआरतीही राहिली
पहाटे मंदिरात स्वच्छता होताच काकड आरती होते. एका मागून एक परिसरातील रहिवासी दर्शनाला आणि पुजेसाठी येतात, मंदिरासमोरली विमल कुदळ या पुजेचे ताट घेवून मंदिरात शिरल्या. झाडाखाली पुजारी मृतावस्थेत पडल्याचे पाहून त्यांनी आरडा ओरड करुन कॉलनीतील रहिवाशांना बोलावले. गर्दी एकवटून रहिवाश्यांनी स्वतःच विद्युतपुरवठा खंडीत करुन पुजारींना उचलून दवाखान्यात नेले. तपासणी अंती डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यावर शनिपेठ पेालिसात अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक रघुनाथ महाजन करीत आहे.
मंदिराचा वर्धापनदिन
जुना खेडी रेाडवर तुळजाईनगरातील खुल्या भुखंडावर (ओपन स्पेस) महापालिकेच्या संत जगनाडे महाराज उद्यान आहे. उद्यानात 2012 साली परिसरातील रहिवाशांनी एकत्रीतपणे साई- गणेश मंदिर देवस्थान उभारले आहे. मंदिराचे बांधकाम झाले तेव्हापासून अनुपम यादव हेच पूजारी म्हणून कार्यरत होते. शनिवार (ता.१२) रोजी मंदिराचा वर्धापनदिन दिन असल्याने महापुजेसह इतर धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरावर रेाषणाई करण्यात येवुन पुजारी महाराजांनी भक्त भाविकांना त्यांच्याच हस्ते महाप्रसादाचे वाटपही केले. परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर होते.
संपादन ः राजेश सोनवणे