भीक मागता मागता एक दिवशी वृध्दा पडली नाल्यात; याच कारणातून मिळाली आजीला नवी दृष्टी 

अमोल अमोदकर
Wednesday, 16 September 2020

नवीन दृष्टी मिळाल्यानंतर आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्याजोगा होता. आज त्या स्वतः कुणाचाही आधार न घेता चालू शकतात.

बोदवड  : लॉकडाउनच्या काळात सर्वच घटकांची होरपळ झाली. भिक मागणाऱ्यांना तर रस्ताही दुरापास्त झाला. जिथे दोन वेळेचे पोट भरण्याची भ्रांत, तिथे त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न तर दूरच...अशाच एक साधारण ६२ वर्षांच्या आजीबाई घरोघरी मागून आपला उदरनिर्वाह करीत होत्या. इंदूबाई पवार त्यांचं नाव...आजींना दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू असल्याने काहीच दिसत नव्हते...एक दिवशी त्या चालता चालता अक्षरशः नाल्यात पडल्या...ही बाब जेव्हा आत्मन्मान फाउंडेशनचे प्रतिनिधी समाधान पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच त्यांची तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली. आत्मसन्मानच्या या प्रयत्नामुळे आजीबाईंना नवी दृष्टी मिळाली आहे. 

अरे व्वा ! जळगाव परिसरात आहे फुलपाखरांच्या ५५ विविध प्रजाती
 

प्राथमिक तपासणीसाठी बोदवडमधील दृष्टी नेत्र तपासणी सेंटर येथे आजींची तपासणी केली. येथून शस्रक्रियेसाठी नांदुरा येथील १०५ फूट हनुमानजी मूर्ती उभारणारी संस्था श्री तिरुपती बालाजी संस्थानकडून संचालित मोहनराव नारायणा नेत्रालय येथे आजींची मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात आली. 
यात डॉक्टरांनी व येथील कर्मचारी बंधू भगिनींनी अतिशय काळजीपूर्वक सुश्रृशा केली. आजींसाठी जेवणाची, राहण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. परिणामी, शस्रक्रिया झाल्यानंतर आजींना दिसू लागले आहे. आज त्या स्वतः कुणाचाही आधार न घेता चालू शकतात.

वाचा ः जळगाव मनपात अधिकाऱयांच्या भोंगळ कारभारावर सदस्यांनी ओढले ताशेरे ! 

नवीन दृष्टी मिळाल्यानंतर आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्याजोगा होता. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोहनराव नारायणा नेत्रालयाचे अध्यक्ष म्हणाले, की इंदूबाई पवार (रा. बोदवड) यांना जेव्हा नांदुरा येथे नेत्रालयात आणले होते, तेव्हा त्यांना काहीच दिसत नव्हते, ते पाहून मन व्यथित झाले, पण शस्रक्रिया झाल्यानंतर आजीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनात भाव जागला की संस्थेकडून नेत्रालय चालविण्याचा हाच उद्देश आहे, की नेमक्या गरजूपर्यंत ही सुविधा पोहचावी आणि ही वाटचाल योग्य दिशेला आहे. आजींना पुन्हा दृष्टी मिळून देण्यासाठी मोहनराव नारायणा नेत्रालयाची टीम व आत्मसन्मानचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.  
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bodwad With the help of the foundation, a poor old man got a new vision