esakal | खड्यांमुळे कन्नड घाटाची लागली वाट ! वारंवार होतेय वाहतूक जाम
sakal

बोलून बातमी शोधा

खड्यांमुळे कन्नड घाटाची लागली वाट ! वारंवार होतेय वाहतूक जाम

दक्षिण भारतात जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत सोईचा असल्याने या मार्गाने अवजड वाहतुक अधिक प्रमाणावर धावत असते. 100 वर्षापेक्षा अधिक काळ झालेल्या औट्रम घाटाची दिवसेंदिवस दुर्दशा होत आहे

खड्यांमुळे कन्नड घाटाची लागली वाट ! वारंवार होतेय वाहतूक जाम

sakal_logo
By
दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) :  चाळीसगाव-कन्नड दरम्यान असलेल्या औट्रम(कन्नड घाट)घाटाची खड्ड्यांमुळे अतिशय दयनीय अवस्था झाली असून गेल्या काही दिवसापासून घाट वारंवार जाम होण्याचे प्रकार घडत आहेत.दोन दिवसातच जीवघेण्या खड्ड्यांमुळे तब्बल पाच वाहने घाटातच नादुरूस्त झाली होती.परिणामी घाटातील वाहतुक अक्षरशा जाम झाली होती.ही वाहतुक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीसांना अक्षरशा दमछाक होत आहे. वारंवार घाट जाम होण्याच्या प्रकारामुळे घाटातील वाहतुकच बंद पडण्याची भिती व्यक्त होत आहे.


धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील चाळीसगाव ते कन्नड दरम्यान सुमारे  111 किमीचा घाट आहे. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या या महामार्गावरून दररोज हजारो अवजड वाहनांसह लहान मोठी वाहने धावत असतात. दक्षिण भारतात जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत सोईचा असल्याने या मार्गाने अवजड वाहतुक अधिक प्रमाणावर धावत असते. 100 वर्षापेक्षा अधिक काळ झालेल्या औट्रम घाटाची दिवसेंदिवस दुर्दशा होत आहे.

आपघाताचे प्रमाण वाढले 

कन्नड घाटात अपघात होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. गेल्या दोन वर्षात या घाटात शेकडो वाहनांचा अपघात होवून कित्येकांचा बळी गेला आहे. शिवाय रसत्याच्या दयनीय आवस्थेने  वाहनांचे न भरून निघणारे अतोनात नुकसान होत आहे. घाटातील धोकादायक कठडे, अरूंद रस्ते, त्यात पडलेले खड्डे यामुळे घाटातून वाहन चालवणे म्हणजे यमराजाच्या दरबारात चालण्यासारखे आहे. थोडाजरी संयम ढळला तरी वाहन घाटात खोल दरीत गेलेच समजा. औट्रम घाटातील खड्ड्यांमुळे वाहने चालवतांना अत्यंत जिकरीचे ठरत आहे. खड्डे टाळण्याच्या नादात वाहनांवरील ताबा सुटून अपघात वाढले आहे.

थातूरमातुर काम केले  जाते

कन्नड घाटाची गेल्या अनेक दिवसापासून  दुर्दशा झाली असतांना देखील राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.वाहनधारकांचा जीव अक्षरशा टांगणीला लागलेला आहे.घाटात प्रवेश करताच क्षणी यमराज पाठीशी लागला की काय अशी अवस्था वाहनधारकांची होते.वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा हा मार्ग असून देखील त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष दिवसेंदिवस वाहनधारकांना महागात पडत आहे.कन्नड घाटात बोगदा प्रस्तावित आहे. त्यामुळे घाटाचे काम थातूरमातुर करून भागवले जाते. प्रत्यक्षात बोगद्याचाही प्रश्न मार्गी लागत नाही. आताही पडलेले खड्डे बुजवण्यासाठी आणखी आठवडा लागणार असल्याचे सांगितले जाते. 

दोन दिवसात पाच वाहने नादुरुस्त

औट्रम (कन्नड घाट) घाटात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्यामुळे घाटातच वाहने नादुरूस्त पडून वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रकार वाढले आहे. गेल्या दोन तीन दिवसात तर घाटात ठिकठिकाणी तब्बल 5 ते 6 वाहने नादुरूस्त झाली. परिणामी घाटातील वाहतुक दोन्ही बाजुंनी जाम झाली. कित्येक तास वाहनधारकांना घाटातच अडकून पडून राहावे लागले. लहान मुले, महिला यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. वाहतुक सुरळीत होत नाही तोपर्यंत घाटातच वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन थांबावे लागते. कधी दरड कोसळेल याची भिती असते.

महामार्ग पोलीसांची तत्परता

कन्नड घाटात गेल्या चार पाच दिवसापासून वाहतुक वारंवार जाम होण्याचे प्रकार वाढले आहेत.महामार्ग पोलीस कर्मचारी नितीन ठाकूर, दिनेश चव्हाण, शैलेश बाविस्कर, योगेश बेलदार, रिहान पठाण, नरेश सोनवणे, जितु माळी, पांडुरंग पाटील, प्रताप पाटील, सोपान पाटील यांनी कोरोनाचे संकट असतांना देखील जीवावर उदार होत आपले कर्तव्य बजावून ही जाम झालेली वाहतुक सुरळीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.आज गुरुवारी पहाटे चारपासून पुन्हा घाटातील वाहतुक जाम झाली होती.या पोलीसांनी ही वाहतुक एकेरी मार्गाने सुरु करुन घाटातील कोंडी फोडली.

संपादन- भूषण श्रीखंडे