चाळीसगावातील भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत घेतला प्रवेश !

दिपक कच्छवा
Thursday, 5 November 2020

पाटबंधारे मंत्री असताना चाळीसगाव तालुक्यात आणि परिसरात अनेक लहान मोठी धरणे मंजुर केली त्यामुळे तालुक्यात बागायती क्षेत्र वाढले पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) :  मुक्ताईनगर येथे आज गुरुवारी तालुक्यातील वडाळा वडाळी येथील माजी सरपंचासह भाजपा कार्यकर्त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.भाजपा तालुका पदाधिकाऱ्यांना हा धक्का असल्याचे मानले जाते.

वाचा- महाराष्ट्रात प्रथम सीसीआय कापूस केंद्र सुरू होण्याचा मान शिंदखेडयाला !

एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना मानणारे कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे सांगितले जाते. मुंबई येथील प्रवेश सोहळ्यात चाळीसगाव येथून केवळ कैलास सुर्यवंशी, डॉ. संजीव निकम हेच गेले होते. इतर खडसे समर्थकांनी थांबा आणि वाट पहा अशी भूमिका घेतलेली असतांनाच आज रोजी वडाळे वडाळे येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व सहकार क्षेत्रातील पदाधिकारी यांनी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

यात माजी सरपंच नारायण हरी अहिरराव, हिलाल देवराम अहिरराव, माजी विकासो चेअरमन युवराज कौतीक अहिरराव, तसेच दत्तू मधुकर पाटील, संजय हिम्मत अहिरराव, विकास मधुकर आमले, हिरकणाबाई पाटील,गायत्री पाटील, लक्ष्मीबाई पाटील,रंजना पाटील,अनिता पाटील,आशाबाई पाटील,संगीता पाटील, किशोर आमले, भोजराज आमले, शिंपी सर,कुणाल पाटील, सतिष पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, पाटबंधारे मंत्री असताना चाळीसगाव तालुक्यात आणि परिसरात अनेक लहान मोठी धरणे मंजुर केली त्यामुळे तालुक्यात बागायती क्षेत्र वाढले पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. कृषी मंत्री असताना लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र तालु्नयासाठी मंजूर केले आहे ते पूर्णत्वास न्यायचे आहे त्यासाठी मी परत पाठपुरावा करणार आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो आगामी काळात सर्वांनी पक्ष वाढीसाठी मेहनत घ्यायची आहे आणि येत्या सर्व निवडणुका मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची विजयी पताका फडकवायची असे आवाहन त्यांनी केले.

आवश्य वाचा- पक्षी निरीक्षणात पहिल्याच दिवशी ‘लॉंग लेग्ड बझार्ड’चे दर्शन ! 
 

यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेश चिटणीस मनिष आमले, सरपंच अशोक आमले, बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती राजू माळी, विलास धायडे, सुनिल काटे, रुपेश भोसले,निरज आमले,शिवराज पाटील,योगेश कोलते, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon BJP workers from Chalisgaon join NCP!