esakal | चाळीसगावात पुन्हा वाढली ‘कोरोना’ची भीती 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पिलखोड (ता. चाळीसगाव) गावातही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. आरोग्य विभागाने तीन ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करून जवळपास २२ जणांना क्वारंटाइन केले आहे.

चाळीसगावात पुन्हा वाढली ‘कोरोना’ची भीती 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ‘क्वारंटाइन’ करण्यात आलेल्या शहरातील देवी गल्‍ली भागातील साठवर्षीय वृद्धाचा काल (२८ जून) सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांचा तपासणी अहवाल कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आला. शिवाय प्रताप चौकातही कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने शहरवासीयांमध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रभाग १३ मधील सराफ बांधवांसह कापड, भांडे व्यापाऱ्यांसह रहिवाशांनी पालिकेच्या आरोग्य सभापती सायली जाधव व सामाजिक कार्यकर्ते रोशन जाधव यांच्या नेतृत्वाखाली ७ जुलैपर्यंत स्वयंस्फूर्तीने बंदचा निर्णय घेतला आहे. 
शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पिलखोड (ता. चाळीसगाव) गावातही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. आरोग्य विभागाने तीन ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करून जवळपास २२ जणांना क्वारंटाइन केले आहे. येथील कोविड केअर सेंटरमधून शुक्रवारी (२६ जून) क्वारंटाइन केलेल्या ६४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता, पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ज्यात चार महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. शहरातील जय बाबाजी चौक जहागीरदार वाडी येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्‍या ११ जणांना क्वारंटाइन केले असून, त्‍यांचेही स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. शहरातील देवी गल्‍ली भागातील साठवर्षीय वृद्धाचा काल (२८ जून) हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने वृद्धाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. याशिवाय राजदेहरे (ता. चाळीसगाव) येथे येऊन गेलेल्या कन्‍नड येथील डॉक्‍टरांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर यांनी सांगितले. 

तीन कंटेन्मेंट झोन 
प्रशासनाने शहरातील देवी गल्लीच्या परिसरासह पिलखोड व राजदेहरे गावातील कोरोनाबाधितांच्या निवासस्थानांचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहेत. या तिन्ही ठिकाणी तहसीलदार अमोल मोरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्‍कर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड आदींनी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. सध्या देवी गल्ली परिसरातील सहा, पिलखोड व राजदेहरे येथील प्रत्येकी आठ अशा २२ जणांना क्वारंटाइन केले आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या शहरातील गोपाळपुरा भागातील सहा रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करण्‍यात आले. उपचारानंतर सर्वांना घरी सोडून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. 
 
बैठकीत स्वयंस्फूर्तीने बंदचा निर्णय 
शहरातील प्रभाग १३ मध्ये येणाऱ्या देवी गल्ली व प्रताप चौक येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने या भागातील सोन्या- चांदीचे व्यापारी, कापड, भांड्यासह इतर सर्व दुकानदारांनी उद्यापासून (३० जून) सहा दिवसांचा बंद स्वयंस्फूर्तीने बंद पुकारला आहे. यासाठी या भागाच्या नगरसेविका सायली जाधव, रोशन जाधव यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला. याप्रसंगी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष भवरलाल जैन, दिलीपकुमार मेहता, सायरचंद जैन, प्रदीप घोडके, दिलीप जैन, प्रदीप देशमुख, अशोक कळंत्री, सुनील नेरकर, नंदकिशोर बाविस्कर, हितेश जैन, अमित दायमा, निलेश सराफ, सुशील जैन, दिनेश विसपुते, सीताराम वानखेडे, कपिल अग्रवाल, शंकर गुंडीयाल, माणिक जैन, चेतन जैन, संतोष फडतरे, नकुल बाविस्कर, प्रवीण जैन, सुभाष जैन, मनोज सोळंकी, मुकुंद वर्मा, संदीप सोनार, भूषण पिंगळे आदी उपस्थित होते. 

चाळीसगाव तालुक्‍यातील एकूण रुग्‍ण .... ४० 
उपचारानंतर कोरोनामुक्‍त झालेले .......... २० 
कोरोनामुळे आता‍तापर्यंत झालेले मृत्‍यू ...... ०३ 
सध्‍या उपचार घेत असलेले रुग्‍ण ......... १६