बहाळ येथे गिरणा नदीच्या प्रवाहात बालिका बुडाली; आंघोळीचा मोह जीवावर बेतला !

दिपक कच्छवा
Saturday, 10 October 2020

ज्या घरात लग्न होते़ त्या घरात पहिल्या दिवसापर्यंत आनंदाचे वातावरण होते.मात्र आज दुसऱ्या दिवशी ही दुर्देवी घटना घडल्याने विवाह सोहळ्यावर दु:खाचे सावट पसरले.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव):  गिरणा नदीवरील डोहावर कपडे धुण्यासाठी तिघी बालिकांना कपडे धुतांना आंघोळ करण्याची हौस आली. मात्र हीच हौस त्यांच्या जीवावर बेतली. गिरणेच्या पाण्यात उतरलेल्या तिघी बालिकांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या वाहुन गेल्या. हा प्रकार तेथून जाणाऱ्या तरुणाच्या लक्षात येताच त्याने क्षणाचा विलंब न करता डोहात उडी घेतली. दोघा बालिकांना वाचवण्यात त्याने यश मिळवले पण तिसरी बालिका डोहाच्या पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाली. या बेपत्ता बालिकेचा युद्ध पातळीवर शोध घेण्याचे काम सुरू आहे. ही दुर्देवी घटना बहाळ (ता.चाळीसगाव) येथे शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

आवश्य वाचा- कुटूंब कार्यक्रमात; चोरट्यांनी भरदिवसा लांबविले १५ लाख

या घटनेची माहिती अशी की, पूनम उखा खैरनार (वय 13) ही बालिका मूळ पाचोरा येथील रहिवासी आहे़. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती पनवेल येथे मावशीकडे राहत होती. चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथे तिच्या नातेवाईकाकडे लग्न असल्याने नुकतीच ती कुटुंबियासमवेत आलेली होती. नातेवाईकाकडील लग्नाला पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथील तिच्या मावस बहिणी खुशी चंद्रकांत सौदागार (वय-13) व मनिषा चंद्रकांत सौदागर (वय-11) या दोघीही आलेल्या होत्या़.आज सकाळी त्या कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या असतांना घडले. 

आघोंळ करतांना घडली घटना

बहाळ (ता.चाळीसगाव) येथे घराजवळच हाकेच्या अंतरावर गिरणा नदी असल्याने त्या काल (ता.९) रोजी शुक्रवारी या ठिकाणी अंघोळीला गेल्या होत्य़ा़. त्यानंतर आज (ता.१०) शनिवारी सकाळी 9 वाजता त्या कपडे धुण्यासाठी नदीतील डोहाजवळ गेल्या. त्यावेळी त्यांना आंघोळ करण्याची हौस आल्याने त्या आंघोळ करीत असतांना खोल डोहातील पाण्याचा अंदाज न असल्याने अचालक पुनम पाण्यात बुडू लागली.इतर दोघीही पाण्यात ओढल्या जावू लागल्या त्यांना बुडतांना तरुण तेथे धावतच आला. 

तरुणाने वाचविले दोघींना एक मात्र बेपत्ता

या तिघी बहिणी नदीच्या पाण्यात बुडत असतांना त्याचवेळी या डोहाच्या बाजुने जाणाऱ्या गणेश अशोक भोई या तरुणाच्या हा प्रकार लक्षात आले. त्याने क्षणाचा विलंब न करता नदीत उडी घेऊन ख़ुशी व मनीषा या दोन्ही सख्या बहिणींना पाण्यातून बाहेर काढले़. मात्र त्याचवेळी पाण्याच्या प्रवाहात पुनम हरवली. तिचा शोध घेतला पण मिळून आली नाही. गणेश भोई हा दोघा बहिणींसाठी देवदूतच ठरला. तो आला नसता किंवा थोडा जरी उशिर झाला असता तर तिघीही बालिका नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेल्या असत्या.तीन मुली नदीत बुडाल्याची माहिती बहाळ गावात कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहूणबारे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने शोधकार्य राबविले.मात्र दुपारपर्यंत बेपत्ता पूनमचा शोध लागलेला नव्हता.

वाचा- बिहारमध्ये हिंदीतून प्रचार आणि मांडणार भाजपच्या बंडखोरीचा मुद्दा : पालकमंत्री पाटील
 

पहिल्या दिवशी आनंद दुसऱ्या दिवशी शोक

ज्या घरात लग्न होते़ त्या घरात पहिल्या दिवसापर्यंत आनंदाचे वातावरण होते.मात्र आज दुसऱ्या दिवशी ही दुर्देवी घटना घडल्याने विवाह सोहळ्यावर दु:खाचे सावट  पसरले.या घटनेच्या ठिकाणी मेहुणबारे पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी भेट दिली. या मुलीचा शोध घेण्याचे काम अद्यापही सुरुच होते.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon drowning of a girl in the river Girna