माफिया धडकताय रात्रीला...तिकडची वाळू संपली म्‍हणून चाळीसगावात  

दीपक कच्छवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

खेडगाव रस्त्यावर गस्त घालत असतांना विना क्रमांकाचे ट्रॅ्क्टर पथकाच्या दृष्टीस पडले. पथकाने ट्रॅ्क्टर थांबवले असता त्यात गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुक मिळून आली. पथकाने वाळूसह हे ट्रॅ्क्टर जप्त करून मेहूणबारे पोलीसांच्या ताब्यात दिले.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील वाळू माफियांनी भर पावसाळ्यातही गिरणेचे वस्त्रहरण सुरुच ठेवले असतांना आता भडगाव तालुक्यातील वाळू माफिया ट्रॅक्टरचालक चाळीसगाव तालुक्यात चोरटी वाळूची वाहतुक करीत आहेत. मेहूणबारेचे मंडळाधिकारी गणेश लोखंडे व सहकाऱ्यांनी आज पहाटे जामदा-खेडगाव रस्त्यावर गस्तीदरम्यान अवैध वाळू वाहतुक करणारे एक ट्रॅक्टर पकडले. हे ट्रॅ्क्टर भडगाव येथील आहे.     
मेहूणबारे (ता.चाळीसगाव) मंडळाचे सर्कल गणेश लोखंडे, तलाठी व्ही. बी. शेळके, एस. डी. चव्हाण व आर. डी. नन्नवरे यांचे पथक आज पहाटे चारच्या सुमारास जामदा खेडगाव रस्त्यावर गस्त घालत असतांना विना क्रमांकाचे ट्रॅ्क्टर पथकाच्या दृष्टीस पडले. पथकाने ट्रॅ्क्टर थांबवले असता त्यात गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुक मिळून आली. पथकाने वाळूसह हे ट्रॅ्क्टर जप्त करून मेहूणबारे पोलीसांच्या ताब्यात दिले. हे ट्रॅ्क्टर गणेश संतोष मराठे (रा. भडगाव पेठ) याचे मालकीचे निष्पन्न झाले आहे. अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या या ट्रॅ्क्टरवर दंडात्मक कारवाई करण्याचा अहवाल तहसीलदार चाळीसगाव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

भडगावच्या माफियांचीही नजर पडली इकडे
चाळीसगाव तालुक्यात वाळू माफियांनी कहर केला आहे. गिरणा पात्र तर हे माफिया अक्षरशा ओरबडून काढत आहे.महसूल विभागाचे पथक रात्रंदिवस कोरोनाचे संकट असतांना देखील जीव धोक्यात घालून वाळू चोरांविरोधात कारवाया करीत आहेत. चाळीसगाव तालुक्यातील वाळू माफिया महसूल पथकाला जुमानेसे झाले असतांना आता भडगाव तालुक्यातील वाळू माफियांची नजर चाळीसगावच्या गिरणेवर पडली असल्याचे महसूल विभागाने आज पहाटे केलेल्या कारवायांवरून दिसून येते.

भडगावचीही वाळू चाळीसगावात?
एकीकडे चाळीसगाव तालुक्यातील गिरणा पात्रातील वाळू पोखरण्याचे पद्धतशीर काम स्थानिक वाळू माफियांकडून सुरु असतांना आता भडगाव तालुक्यातूनही गिरणेची वाळू चाळीसगावकडे येत असल्याची चर्चा आहे. भडगावातील काही ट्रॅ्क्टर या अवैध वाळू वाहतुकीच्या दिमतीला असून एका ठिकाणी ही वाळू साठवून त्याची चाळीसगाव परिसरात डंपरद्वारे वाळूची वाहतुक होत असल्याची चर्चा आहे.विशेष म्हणजे काही डंपरचालक गिरणेची वाळू चोरून त्याला गुजरातच्या ठेक्याची पावती देतात.काही दिवसापूर्वी महसूल विभागाने एक डंपर पकडले होते. त्याच्याकडे नंदूरबारकडील ठेक्याची पावती मिळून आली होती. ही पावती खरी की खोटी? याबाबत काय कारवाई झाली? हे कळून आले नाही. मात्र एकंदरीत अवैध वाळू वाहतूक करणारे रॅकेट चाळीसगाव व भडगाव तालुक्यात कार्यरत असून महसूल व पोलीस यंत्रणेतील काही कच्चे दुवे हेरून हे रॅकेट बिनबोभाट वाळू चोरी करून  गिरणेची लुट करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon girna river valu mafiya chori night