महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार 

महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार 

चाळीसगाव  : तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ जातो. सद्य:स्थितीत त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, महामार्गाची दुरवस्था झाली आहे. या कामासंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी माहिती घेतली असता, कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे, असा आरोप आमदार चव्हाण यांनी केला आहे. 

या महामार्गाच्या साइडपट्ट्या खराब झाल्या असून, आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत चाळीसगावचे आमदार चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संबंधित प्रकल्प संचालक यांच्याकडून माहिती घेतली असता, या कामाची रक्कम ३ कोटी २७ लाखांच्या दुरुस्तीबाबतची निविदा प्रसिद्ध होऊन २२ जुलैला त्याचे कार्यारंभ आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेला असून, काम पूर्णत्वाची मुदत ही ३ महिने म्हणजेच २१ ऑक्टोबर २०२० पर्यंत असल्याचे सांगण्यात आले. 

आमदार मंगेश चव्हाण यांनी गुरुवारी पंचायत समिती सदस्य पीयूष साळुंखे, अभियंता हेमंत पाटील तसेच संबंधित विभागाचे अभियंता अग्रवाल यांच्यासोबत सुरू असलेल्या दुरुस्तीच्या बोढरे ते धुळे या एकूण ६२.८ किलोमीटर कामाची पाहणी केली. पाहणी दरम्यान रस्त्यावरील खड्डे न भरलेल्या अवस्थेत आढळून आले. तसेच आजूबाजूचे झाडेझुडपे काढण्याबाबत कोणत्याही प्रकारचे काम केलेले आढळले नाही. काही ठिकाणी भरलेले खड्डे हे आजच्या स्थितीला उखडलेले दिसले. निविदेतील मानांकनाप्रमाणे खड्डे भरणे अपेक्षित असताना झालेले काम देखील त्याप्रमाणे केलेले आढळले नाही. तसेच ज्या ठिकाणी रस्ता सुस्थितीत होता. त्याठिकाणचेच साखळी क्रमांक घेऊन चांगल्या रस्त्यावरच कार्पेट केलेले आढळले. तसेच निविदेत साइडपट्ट्यांना मुरूम पसरवून त्यावर पाणी शिंपडून दबाई करणे, रोड साइड फर्निचर (दिशादर्शक सूचना फलक आदी) बसविणे आदी कोणत्याच प्रकारची कामे करण्यात आलेली नाहीत. या गंभीर प्रकाराबाबत त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागपूर येथील प्रादेशिक अधिकारी यांना पत्र लिहून पुढील बाबींकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. 

पत्रात नमूद केले आहे, की निविदेप्रमाणे १९ लाख ७७ हजार रुपयांची बीयूएसजीचा ७५ मिमीचा खड्डे भरण्यासाठी थर करणे अपेक्षित असताना त्याऐवजी थेट खडी व माती टाकून खड्डे भरलेले आढळले, तसेच भरलेले खड्डे देखील कार्पेट होण्याआधीच उखडलेले निदर्शनास आले. निविदेप्रमाणे १८७ लाख ५० हजार रकमेचे पॉट होल्स दुरुस्त घेण्यात आले आहेत. दुरुस्ती करण्यासाठीचा खड्डा व्यवस्थित कोरून खाली ७५ मिलिमीटरचे बीएम करणे आवश्यक असताना देखील याप्रमाणे खड्डे भरण्यात आलेले नाहीत. निविदेप्रमाणे ७८.९४ लाखांचे कार्पेट व सीलकोट घेण्यात आलेले असून काही ठिकाणी दुरुस्ती न करता कार्पेट केल्याचे दिसून आले. ही अतिशय अशोभनीय व गंभीर बाब आहे. पूर्ण रस्त्याच्या लांबीत व निविदेप्रमाणे फक्त २० टक्के काम केलेले आढळते व तेही निकृष्ट दर्जाचे व मानांकनानुसार नसल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. तसेच या कामावर आजतागायत १ कोटी ३० लक्ष इतका खर्च झाल्याचे सांगण्यात आले. 


..अन्यथा तीव्र आंदोलन 
कार्यारंभ आदेशाप्रमाणे कामाची मुदत आजपासून केवळ २१ दिवसात म्हणजेच २१ ऑक्टोबर २०२० ला संपणार असून नमूद दुरुस्ती कामाचा दोष देय कालावधी हा ६ महिन्याचा आहे हेही संबंधितांकडून सांगण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत केवळ २० टक्के काम झालेले आढळते. उर्वरित ८० टक्के काम हे कधीपर्यंत पूर्ण करण्यात येईल याबाबत साशंकता वाटते. संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मुख्य मक्तेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच यात सहभागी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात यावी. कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आमदार चव्हाण यांनी पत्राद्वारे दिला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com