esakal | ‘हाथरस’चे जळगावात संतप्त पडसाद 
sakal

बोलून बातमी शोधा

‘हाथरस’चे जळगावात संतप्त पडसाद 

जळगावातील महिला संघटनांसह सर्वपक्षीय नेत्यांनीदेखील हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदविला. या घटनेच्या निषेधार्थ काळे फुगे सोडण्यात आले. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे दिसून येत आहे.

‘हाथरस’चे जळगावात संतप्त पडसाद 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे देशभरात संतप्त पडसाद उमटले आहेत. जळगावातदेखील गुरुवारी विविध सामाजिक, तसेच राजकीय संघटनांतर्फे निषेध नोंदविण्यात आला. विविध संघटनांनी जिल्हाधिकारी

कार्यालय परिसरात एकत्र येत या संतापजनक घटनेविरोधात आंदोलने केली. 
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका युवतीवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिशय संतापजनक असणाऱ्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून, देशभरात संतप्त पडसाद उमटले आहेत. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी गुरुवारी जळगावातदेखील काही सामाजिक व राजकीय संघटना एकत्र आल्या. 

राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाले. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, उपप्रदेशाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, जिल्हाध्यक्ष उत्तम मोरे आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. चर्मकार महासंघाचे इतर सदस्य व पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. 

सर्वपक्षीय नेत्यांनी नोंदविला निषेध 
जळगावातील महिला संघटनांसह सर्वपक्षीय नेत्यांनीदेखील हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदविला. या घटनेच्या निषेधार्थ काळे फुगे सोडण्यात आले. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेश पोलिस आणि तेथील सरकार कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप झाला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या हाथरस येथील घटनेचा निषेध व मृत्युदंडाची मागणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेनेच्या सरिता माळी-कोल्हे, गजानन मालपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला पाटील, वाल्मीक पाटील, कम्युनिस्ट पार्टीचे जे. बी. ठाकरे, मराठा सेवा संघाचे मनोज भास्कर पाटील, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र बागरे, ललित करोसिया, जय ढंढोरे, आनंद सोनवाल, मनोज पांडे, ललित शर्मा, राजेश गोयर, सुरेश चांगरे आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला. 

नियाज अली मंचातर्फे थाळीनाद 
या संतापजनक घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नियाज अली मंचातर्फे थाळीनाद करण्यात आला. उत्तर प्रदेशात महिला व युवतींवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटनांवर अंकुश ठेवण्यात तेथील सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत नियाज अली मंचातर्फे कारवाईची मागणी करण्यात आली. 


आंदोलकांच्या मागण्या 
या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण मिळावे, आरोपींना कठोर शिक्षा करून पीडितेला त्वरित न्याय मिळाला पाहिजे, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image