चोवीस मोटारसायकली चोरण्यात यशस्वी...पण चाळीसगावात अडकलेच 

आनन शिंपी
Saturday, 11 July 2020

जळगाव, धुळे व नाशिक या तीन जिल्‍ह्यामधून मोटारसायकली चोरल्या. चोरलेल्या मोटारसायकली गरजुंना कमी किंमतीत विकायच्या आणि त्यावर मौजमस्ती करायची असा त्यांचा फंडा होता.

चाळीसगाव : चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तिघांकडून ११ लाख ४० हजार रूपये किंमतीच्या सुमारे २४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. अटक केलेल्यांमध्ये दोन जण बहाळचे, तर एक संशयित पोहऱ्यातील रहिवासी आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला तिघा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अवश्‍य वाचा - जुगाड टेक्‍नॉलॉजी...मोटर सायकलची केली तिफण 

अमोल वाघ (रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा) यांची हिरो होंडा कंपनीची स्पेलंडर प्लस ही गाडी घाट रोड स्वागत हॉटेलजवळून चोरी झाल्याची तक्रार चाळीसगाव ग्रामीण पोलिसात (ता. ६) तक्रार दाखल झाली. त्याच दिवशी हॉटेलच्या सीसीटिव्ही फुटेजवरुन अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे,उ पविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने एक पथक तयार केले. यात पोलिस उपनिरिक्षक संपत आहेर, आभिजित लांडे, पोलिस हवलदार युवराज नाईक, नितीन आमोदकर, गोकूळ सोनवणे, भुपेश वंजारी, शांताराम पवार, नितीश पाटील, प्रेमसिंग राठोड, बिभीषण सांगळे, ज्ञानेश्वर वाघ, वाहन चालक संजय पाटील या कर्मचाऱ्यांनी पहिला मुख्य आरोपी विवेक शिवाजी महाले (वय २४, रा. बहाळ) याचेकडून आठ मोटारसायकली, त्याचा दुसरा साथीदार ईश्वर शिवलाल भोई (वय ४२, रा. बहाळ) याचेकडून सात मोटारसायकली, तर तिसरा साथीदार आकाश ज्ञानेश्वर महाले याचेकडून नऊ अशा विविध कंपनीच्या चोवीस मोटारसायकली अंदाजे किंमत अकरा लाख चाळीस हजार रुपयाची चोरी उघड करण्यात यश आले. 
 
मोटारसायकली विकून मौजमस्‍ती 
मोटारसायकली चोरीप्रकरणी अटकेत असलेल्या तिघांपैकी ईश्वर भोई हा मासेमारीचा व्यवसाय करतो. तर इतर दोघे मजुरी करतात. तिघांनी जळगाव, धुळे व नाशिक या तीन जिल्‍ह्यामधून मोटारसायकली चोरल्या. चोरलेल्या मोटारसायकली गरजुंना कमी किंमतीत विकायच्या आणि त्यावर मौजमस्ती करायची असा त्यांचा फंडा होता. तिघांच्या अटकेमुळे मोटारसायकल चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.  

संपादन : राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon Motorcycle thief three district chalisgaon police arrested