चाळीसगावात जणू गुटख्याची खाण; पोलिसांची पुन्हा कारवाई

आनन शिंपी
Saturday, 21 November 2020

गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर ठेवली आहे. असे असले तरी बरेच जण छुप्या मार्गाने सर्रास गुटखा विकत आहेत. शहरातील हिरापुर रोड परिसरातील कृषी कार्यालयासमोरील विनोद किराणा दुकानात गुटखा विकला जात असल्याची गुप्त माहिती येथील पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मिळाली.

चाळीसगाव (जळगाव) : गुटखा विक्रीच्या विरोधात सध्या पोलिसांची धडक मोहीम सुरू असताना पोलिसांनी शहरातील हिरापूर रोडवरील एका किराणा विक्रेत्याकडे छापा टाकून त्याला गुटखा विकताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 33 हजार 305 रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी विनोद सुदाम येवले याच्या विरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सध्या गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर ठेवली आहे. असे असले तरी बरेच जण छुप्या मार्गाने सर्रास गुटखा विकत आहेत. शहरातील हिरापुर रोड परिसरातील कृषी कार्यालयासमोरील विनोद किराणा दुकानात गुटखा विकला जात असल्याची गुप्त माहिती येथील पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मिळाली. त्यांच्या आदेशाने विनोद किराणा प्रोव्हीजनवर पोलीस उपनिरीक्षक विजय साठे, हवालदार गणेश पाटील, हवालदार प्रविण सपकाळे, भूषण पाटील यांच्या पथकाने छापा टाकला असता 33 हजार 305 रूपये किमतीचा विमलच्या 120 सुगंधीत पान मसाला व तंबाखू पुड्या असा प्रतिबंधीत साठा जप्त केला. याप्रकरणी विनोद येवले याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला हवालदार गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक विजय साठे करीत आहेत. संशयित आरोपीस येवले यास अटक करण्यात आली असून आज त्याला चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी तपास उपनिरीक्षक विजय साठे करीत आहेत.

तिसरी कारवाई
मेहूणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे 57 लाखाचा गुटखा मागील महिन्यात पकडण्यात आल्यानंतर हॉटेल अन्नपूर्णा जवळील दुकानदारावर कारवाई झाली होती. आता ही तिसरी कारवाई आहे. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गुटख्याचा मूळ विक्रेता मोकाटच
शहरात 55 लाखांचा गुटखा पकडण्याची मोठी कारवाईची घटना ताजी असतानाही गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे ज्या किराणा दुकानावर हा गुटखा सापडला, त्याचा मूळ विक्रेता शहरातील सिंधी कॉलनी भागातील रहिवासी असल्याची चर्चा आहे. शहरातील पानटपरी तसेच किरकोळ विक्रेत्यांकडे पान मसाला विक्री करणारे काही फेरीवाले सर्रास गुटखा विकतात. हा गुटखा शहरातील काही ठराविक विक्रेत्यांकडून खरेदी केलेला असतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईमुळे या व्यवसायात नव्याने देखील काही जण उतरल्याचे दिसून येत आहे. गुटखा विक्रेता वाणी यांनी ज्याच्याकडून गुटखा घेतला त्या घाऊक विक्रेत्याचा शोध घेऊन त्याच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 
 
चाळीसगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही गुटखा विकला जात असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. 
- विजयकुमार ठाकूरवाड, पोलीस निरीक्षक, चाळीसगाव. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon tobaco police action and godaun seal