मालमत्ता कर भरा; वर्षभर मोफत दळण 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 December 2020

उपखेड ग्रामपंचायतीच्यावतीने जो मालमत्ताधारक आर्थिक वर्षाचा कर भरणा करेल त्याला त्या वर्षात मोफत दळण दळून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या स्वनिधीमधून पिठाची गिरणी सुरू करण्यात आली.

चाळीसगाव : गावातून विविध करापोटी मिळणारा महसूल नियोजनबद्धरीतीने ग्रामविकासासाठी वापरून ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याचा अनोखा पॅटर्न उपखेड (ता. चाळीसगाव) ग्रामपंचायतीने अमलात आणला आहे. उपक्रमशील ग्रामपंचायत, अशी ओळख असलेल्या उपखेड ग्रामपंचायतीने आता वेळेत मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकास वर्षभर मोफत दळण दळून देण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. 

नक्‍की वाचा- हृदयद्रावक..साई पुजेसाठी महिलेचा मंदिरात प्रवेश; पुजाऱ्याचा मृतदेह पाहून आरडाओरड

उपखेड ग्रामपंचायतीच्यावतीने जो मालमत्ताधारक आर्थिक वर्षाचा कर भरणा करेल त्याला त्या वर्षात मोफत दळण दळून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या स्वनिधीमधून पिठाची गिरणी सुरू करण्यात आली. याप्रसंगी तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी या उपक्रमाचे उद्‍घाटन केले. गिरणी चालू करताना गावाची लोकसंख्या विचारात घेता बाजरी व गहू यांसाठी वेगवेगळ्या गिरणी आणण्यात आल्या आहेत. दुसऱ्या गिरणीचे उद्‍घाटन सहाय्यक गटविकास अधिकारी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही गिरणीचे पूजन गावातील मूळ रहिवासी व मालेगाव येथे वैद्यकीय सेवा देणारे डॉ. योगेश पाटील व डॉ. मृणाल पाटील यांनी केले. तसेच या वेळी गाव स्वच्छ राहावे, यासाठी ग्रामपंचायतीच्या स्वनिधीमधून २० हॉर्सपॉवरचा ट्रॅक्टरसुद्धा घेण्यात आला. त्याचे पूजन ग्रामसेवक संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष संजय निकम यांनी केले. 

गावविकासासाठी मदतीचा ओघ 
विशेष म्हणजे, उपखेडचे भूमिपुत्र जळगावमधील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश पाटील यांनी आपले वडील विश्वासराव पाटील यांच्या स्मरणार्थ शीत शेवपेटी गावासाठी घेऊन दिली. त्याचे लोकार्पण स्वत: पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच गावासाठी ट्रॅक्टर घेण्यात आला. या वेळी ट्रॅक्टर शोरुमचे संचालक विकी शेठ उपस्थित होते. त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन लोकसहभागातून होत असलेल्या शाळा डिजिटलबद्दल माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. तसेच शाळेसाठी ३१ हजार रुपयांचा धनादेश दिला. तसेच उपखेडचे माहेर असलेल्या सुरेखा मगर यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त ११ हजारांचा धनादेश दिला. प्रतिभा देशमुख यांनी देखील वडिलांच्या नावे ११ हजार रुपये रोख स्वरूपात दिले. अरुण पाटील व अशोक पाटील यांनीसुद्धा दहा हजार रुपये रोख स्वरूपात दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon upkhed gram panchayat tax recovery plan