esakal | चाळीसगावचा ‘पाणी पॅटर्न’ जळगाव जिल्ह्यात जलक्रांती घडवीणार ! 
sakal

बोलून बातमी शोधा

चाळीसगावचा ‘पाणी पॅटर्न’ जळगाव जिल्ह्यात जलक्रांती घडवीणार ! 

लोकसहभाग मिळाला तर ते यशस्वी होते, हे चाळीसगावमधील ‘५०० कोटी लिटर जलसाठा’ अभियानाने दाखवून दिले आहे

चाळीसगावचा ‘पाणी पॅटर्न’ जळगाव जिल्ह्यात जलक्रांती घडवीणार ! 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः ‘मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा’ अभियानातून चाळीसगाव तालुक्यात जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. लोकचळवळ बनलेला हा पॅटर्न जिल्ह्यासाठी पथदर्शी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. 
मिशन यशस्वी करणाऱ्या ‘पाच- पाटील’ यांच्याशी संवाद व या कामाचा आढावा घेणाऱ्या ‘चाळीसगावची जलक्रांती’ विशेषांकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

वाचा ः अवैध वाळू उपसा थांबवा अन्यथा उपोषणाला बसू;संतप्त शेतकऱयांनी दिला इशारा !

चाळीसगावचे भूमिपुत्र, आयकर सहआयुक्त डॉ. उज्जवलकुमार चव्हाण उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांपासून जलसंधारणाचे काम लोकचळवळीतून सुरू आहे. नदी-नाले खोलीकरण, बंधारे दुरुस्ती, गाळ काढणे आदी कामांद्वारे या गावांत जलपातळी वाढ व जलसाठा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. या जलसंधारणाच्या कामांची अंमलबजावणी करण्यासाठी ‘पाच-पाटील’ ही संकल्पना राबविली होती. पाच गावांची जबाबदारी घेणारे ११ ‘पाच-पाटील’ या अभियानात पुढे आले. विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य आणि लोकसहभाग यांची सांगड घालून केलेल्या या कामांविषयी जिल्हाधिकारी राऊत यांनी ‘पाच पाटलां’शी आज संवाद साधला. 

डॉ. चव्हाण यांनी या अभियानाविषयीची माहिती जिल्हाधिकारी राऊत यांना दिली. या वेळी जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की चाळीसगावमध्ये झालेल्या या कामांतून एक ‘रोल मॉडेल’ तयार झाले आहे. दुष्काळावर मात करत पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जलसंधारण ही काळाची गरज आहे. या कामात लोकसहभाग मिळाला तर ते यशस्वी होते, हे चाळीसगावमधील ‘५०० कोटी लिटर जलसाठा’ अभियानाने दाखवून दिले आहे. ही चळवळ संपूर्ण जिल्‍ह्यात राबविण्याची गरज आहे. 


चाळीसगावमध्ये सुरू असलेल्या गेल्या तीन वर्षांतील कामांचा आढावा घेणाऱ्या ‘चाळीसगावची जलक्रांती’ या विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. चव्हाण, अंकाचे संपादक धर्मेंद्र पवार, या अभियानातील ‘पाच-पाटील’ प्रा. तुषार निकम, शेखर निंबाळकर, सविता राजपूत, आस्था माळतकर, सोमनाथ माळी, हेमंत मालपुरे, प्रा. आर. एम. पाटील, सचिन राणे उपस्थित होते. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top