चाळीसगाव पालिकेच्या सभेत...फिजिकील डिस्टन्स, इतिवृत्त मंजूर करण्यावरून खडाजंगी 

चाळीसगाव पालिकेच्या सभेत...फिजिकील डिस्टन्स, इतिवृत्त मंजूर करण्यावरून खडाजंगी 

चाळीसगाव :  तब्बल चार महिन्यांनी झालेली येथील पालिकेची सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून आज गाजली. मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यावरून सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. सकाळी अकराला सुरू झालेली सभा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. सभेत फिजिकल डिस्टन्स पाळण्यात न आल्याने विरोधी गटाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सभेच्या अजेंड्यावर 60 विषय होते. यातील बहुतांश विषय मंजूर, तर काही विषय नामंजूर करण्यात आले. 

नगराध्यक्षा आशालता चव्हाण अध्यक्षस्थानी होत्या. प्रभारी मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण व्यासपीठावर होत्या. नगरसेवक चंद्रकांत तायडे यांनी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सभा घेणे गरजेचे होते का, असा प्रश्‍न केला. एखाद्याला कोरोनाची लागण झाली, तर त्याची जबाबदारी नगराध्यक्षा घेतील, असा प्रश्‍न उपस्थित केल्याने वादाला तोंड फुटले. शहर विकास आघाडीचे नगरसेवक सुरेश स्वार यांनी फिजिकल डिस्टन्सचे पालन होत नसल्याचे सांगितले. आघाडीचे नगरसेवक अण्णा कोळी यांनी मुख्याधिकारी नसल्याने एकतर्फी कामकाज सुरू असल्याचा आरोप केला. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाउन करण्याची मागणी सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधी होणार, असा प्रश्‍न स्वीकृत नगरसेवक आनंद खरात यांनी उपस्थित केला. सभेत सत्ताधारी गटप्रमुख संजय पाटील बोलण्यासाठी उठल्यानंतर गदारोळ झाला. घृष्णेश्‍वर पाटील व बंटी ठाकूर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. 

प्रोसेडिंगवरून वादंग 
सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यावर बंटी ठाकूर यांनी आक्षेप घेतला. सभा झाल्यानंतर प्रोसिडिंग सात दिवसांत अपडेट करणे गरजेचे असल्याचे सांगत बंटी ठाकूर, रामचंद्र जाधव यांच्यासह सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी हा विषय रद्द करावा, अशी मागणी केली. मागील सभेतील विषयांवर कोणी विरोध केला, कोणाचे अनुमोदन आहे, हे सभागृहाला समजू द्या, अशी मागणी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी केली. 

एकच माईक असल्याने संक्रमणाचा धोका 
सभेत सदस्यांना बोलण्यासाठी एकच माईक होता. प्रत्येक सदस्याच्या हातावर सॅनिटायझर फवारले गेले, तरी एकच माईक अनेक सदस्यांच्या हाती दिला जात असल्याने संक्रमणाचा धोका असल्याचे सदस्य सांगत होते. तरीही दुसऱ्या माइकची व्यवस्था केली नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com