esakal | नाथाभाऊ गेले म्‍हणून काय झाले; भाजप विचारांवर चालणारा पक्ष ः गिरीश महाजन
sakal

बोलून बातमी शोधा

girish mahajan

भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्याग आणि मेहनतीच्या बळावर पद मिळवले आहे. भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.

नाथाभाऊ गेले म्‍हणून काय झाले; भाजप विचारांवर चालणारा पक्ष ः गिरीश महाजन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चोपडा (जळगाव) : भाजप हा पक्षनिष्ठ व विचारनिष्ठ कार्यकर्त्यांचा समुच्चयवाद आहे. त्यामुळे एकही पदाधिकारी वा कार्यकर्ता पक्ष सोडून जाणार नाही. भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्याग आणि मेहनतीच्या बळावर पद मिळवले आहे. भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. नाथाभाऊ जरी पक्ष सोडून गेले तरी, आमदार, खासदार सोडा, भाजपचा निष्ठावंत कार्यकर्तादेखील पक्ष सोडणार नाही, असा विश्वास माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी चोपडा येथील भाजपच्या आढावा बैठकीत व्यक्त केला. 
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेश संघटक विजय पुराणिक होते. या वेळी वक्त्यांनी चोपड्यातील भाजपच्या यशाला स्व. उत्तमराव पाटील, स्व. माधवराव चौधरी यांच्या विजयापासून मोठी परंपरा असल्याचे सांगून पक्षनिष्ठांची मांदियाळी असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपला सातत्याने भरघोस मते मिळत असतात. जनतेचे भाजप विचारसरणी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास असल्याचे देखील वक्ते म्हणाले. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, ॲड. किशोर काळकर, रवींद्र अनासपुरे, विजय धांडे, सचिन पानपाटील, जिल्हा परिषद बालकल्याण सभापती ज्योती पाटील, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्ज्वला म्हाळके, जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे आदी उपस्‍थित होते.

उमेदवारी मिळो अगर न मिळो, मी भाजपतच राहणार : खडसे 
खासदार रक्षा खडसे यांनी मनोगतात सांगितले, की मी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर जिल्हा परिषद सदस्य, दोनदा लोकसभा सदस्य झाली आहे. ‘मला भविष्यात लोकसभेची उमेदवारी मिळो अथवा न मिळो मी भारतीय जनता पक्षातच माझे कार्य करेन, पक्षासोबतच राहील. माझ्यावर कुटुंबातील कुणाचाही दबाव नाही. मी पक्ष सोडणार नाही.