esakal | चोपड्यात मूळ धरतेय ‘प्लाझ्मा डोनर’ संकल्पना !

बोलून बातमी शोधा

plazma

चोपड्यात मूळ धरतेय ‘प्लाझ्मा डोनर’ संकल्पना !

sakal_logo
By
बालकृष्ण पाटील

गणपूर (ता. चोपडा) : कोरोनाचा कहर सर्वत्र सुरू असताना, रेमडेसिव्हिरचा तुटवडा, त्याचा काळा बाजार आणि ते मिळविण्यासाठी होणारी वणवण आता नवीन नाही. मात्र, वैद्यकीय सल्ल्यानुसार कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला प्लाझ्मा दिल्याने ॲन्टिबॉडीज वाढून रुग्णाचा जीव वाचू शकतो. त्यासाठी प्लाझ्मा देण्याची तयारी दाखविणाऱ्यांची संख्या चोपडा तालुक्यात वाढू लागली आहे.

हेही वाचा: महापालिका कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित जायेना

कोरोनाची लागण होऊन बरे झालेला रुग्ण प्लाझ्मा देऊ शकतो. त्यासाठी त्याचे आजार, ॲन्टिबॉडीजची संख्या अगोदर पडताळून ही प्रक्रिया पार पडते. चोपडा तालुक्यात आतापर्यंत १५ दात्यांनी प्लाझ्मा दिला असून, तो रुग्णांना दिला जाणार आहे. त्यासाठी ४५० मिलिलिटर रक्त काढून ॲन्टिबॉडीज वेगळ्या करून उर्वरित रक्त पुन्हा त्याच मशिनद्वारे शरीरात सोडले जाते. ही भर शरीर दोन दिवसांत भरून काढू शकते आणि हे रक्त जळगाव येथे तपासून प्लाझ्मा घेणे शक्य आहे का, याची खातरजमा केली जाते. एका व्यक्तीने दिलेला प्लाझ्मा दोन कोरोनाबाधितांना देता येतो. रक्तपेढीत असा प्लाझ्मा घेतला जातो, अशी माहिती या कार्यातील जाणकारांनी दिली.

हेही वाचा: उमवितील विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रे आता ‘डिजिलॉकर’मध्ये

चोपडा शहरात उपजिल्हा रुग्णालयात व तालुक्यात लोकसहभागातून विविध उपक्रम राबविणाऱ्या एका स्वयंसेवी टीमकडून यासाठी प्रयत्न सुरू असून, प्लाझ्मा देऊ इच्छिणाऱ्या सुमारे शंभर दात्यांची यादी तयार करण्याचे प्रयत्न असल्याचे एस. बी. पाटील यांनी सांगितले. रक्ताचा तुटवडा लक्षात घेता तरुणांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचा आग्रह स्वयंसेवी बांधवांकडून करण्यात येत असून, प्लाझ्मा देण्याची संकल्पना चोपडा तालुक्यात आशादायक चित्र निर्माण करू शकते, अशी आशा बाळगण्यास बराच वाव आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे