esakal | महापालिका कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित जायेना

बोलून बातमी शोधा

महापालिका कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित जायेना
महापालिका कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित जायेना
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग दोन महिन्यांपासून झपाट्याने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही वाढत असताना, महापालिकेने विलगीकरणासाठी उभारलेल्या कोविड केअर सेंटरकडे रुग्णांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या तीन कोविड सेंटरमध्ये एक हजार ७०० बेड असताना, त्या ठिकाणी केवळ दोनशेच उपचाराधीन रुग्ण असून, उर्वरित एक हजार ७०० बेड रिक्त आहेत.

हेही वाचा: उमवितील विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रे आता ‘डिजिलॉकर’मध्ये

गेल्या वर्षी एप्रिलपासून कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर जळगाव महापालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना राबविल्या. त्याच वेळी शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयात विलगीकरण कक्षासाठी इमारती अधिग्रहीत करून कोविड केअर सेंटर उभारले. त्या ठिकाणी बेडची व्यवस्था करण्यात आली.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात मायक्रो कंटेंटमेंटचा फज्जा !

दुसऱ्या लाटेतही सज्जता

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर एकेक कोविड सेंटर बंद होऊन इमारती पुन्हा महाविद्यालयाच्या ताब्यात देण्यात आल्या. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत गेला व महापालिका प्रशासनाने त्याच रचनेनुसार कोविड सेंटरची सज्जता सुरू केली.

तीन सेंटरची उभारणी

लक्षणे नसलेले व अगदीच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना महापालिकेच्या शासकीय तंत्रनिकेतनातील कोविड सेंटरमध्ये भरती केले जाते. सध्या या ठिकाणी तीन सेंटर असून, एक हजार ७०० बेड आहेत.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कायम

रुग्णांची सेंटरकडे पाठ

असे असले तरी शहरातील कोविड रुग्णांनी या सेंटरकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. गेल्या लाटेत तिन्ही कक्षांमध्ये आठशे ते हजारापर्यंत रुग्णसंख्या होती. या वेळी मात्र संसर्ग झपाट्याने वाढला, तरी हे सेंटर रिकामे पडले आहे. सध्या शहरात सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजारांहून कमी आहे. महापालिका कोविड सेंटरमधील एक हजार ७०० बेडपैकी एक हजार ५०० बेड रिक्त असून, केवळ दोन-अडीचशेच रुग्ण या ठिकाणी विलगीकरणात आहेत.

गृहविलगीकरणावर भर

या वेळच्या लाटेत शहरातील बाधित रुग्णांनी लक्षणे नसतील, तर घरीच उपचार घेण्याचे धोरण अवलंबले आहे. शिवाय या संसर्गात कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होत असल्याने एकाच कुटुंबातील सर्व सदस्य रुग्ण असल्यास घरीच उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. लक्षणे असलेले खासगी हॉस्पिटल अथवा ज्या ठिकाणी उपचारांची सुविधा आहे, अशा कोविड सेंटरमध्ये दाखल होत असल्यानेही महापालिका कोविड सेंटर रिकामी पडली आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे