
खानदेशात बहुतेक साखर कारखाने बंद असून, शहादा येथील सातपुडा तापी सहकारी साखर कारखाना, डोकारे (नवापूर)येथील आदिवासी आणि आयन कारखाने सुरू आहे.
गणपूर (ता. चोपडा) : राज्यात या वर्षी आतापर्यंत १६५ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून, २१२.७३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तसेच १८७.०३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात आतापर्यंतच्या साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग अव्वल असून, तेथे १०.१६ इतका साखर उतारा निघाला आहे.
आवश्य वाचा- ‘बीएचआर’च्या गटारात सारे हात माखलेले !
राज्यात आतापर्यंत ८६ सहकारी आणि ७९ खासगी साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, २०० पेक्षा जास्त कारखान्यांनी या वर्षी गाळपासाठी परवानगी मागितली होती. कोल्हापूर विभागातील ३६, पुण्यातील २७, तर सोलापूर विभागातील ३५ साखर कारखाने सुरू झाले आहेत. नगर विभागात २५, औरंगाबादमधील २०, नांदेडमधील २०, अमरावतीमधील दोन कारखाने सुरू झाले असून, नागपूर विभागातील एकाही कारखान्याचे गाळप सुरू झालेले नाही.
आजच्या घडीला राज्यात दररोज सहा लाख ४० हजार टन उसाचे गाळप सुरू आहे. राज्यात सर्वाधिक कमी साखर उतारा अमरावती विभागाचा असून, तो ७.३४ इतका आहे. खानदेशात बहुतेक साखर कारखाने बंद असून, शहादा येथील सातपुडा तापी सहकारी साखर कारखाना, डोकारे (नवापूर)येथील आदिवासी आणि आयन कारखाने सुरू असून, त्यांचे गाळप अजूनही कमी आहे, तर शिरपूरमधील दत्तप्रभू ॲग्रो, जळगावमधील मुक्ताई शुगरमध्येही उसाचे गाळप सुरू झाले आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे